दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी पालकमंत्री, आमदार सतेज पाटील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षाची धग गुलाबी थंडीत वाढू लागली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालावेळी ढवळला गेलेला दोघातील संघर्ष आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल व राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने उसळी घेताना दिसत आहे. एकमेकांवर शाब्दिक प्रहार करण्याची संधी दवडली जात नाही.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पाटील – महाडिक परिवारातील मैत्री अन शत्रुत्व अशी टोकाची दोन्ही उदाहरणे ठळकपणे दिसून आली आहेत. दोन्ही मात्तबर परिवारात गेले अनेक वर्ष हाडवैर वाढतच आहे. सतेज पाटील हे गृह राज्यमंत्री असताना त्यांचा पराभव करण्यात आला. तेव्हा पाटील यांनी पुन्हा महाडिक परिवाराला गुलाल लावून देणार नाही ,असा निर्धार केला होता. विधान परिषदेत माजी आमदार महादेवराव महाडिक, विधानसभेला त्यांचे पुत्र अमल महाडिक तर गेल्या लोकसभेला धनंजय महाडिक यांना पराभूत झाले. शौमिका अमल महाडिक यांची मुदत संपल्यानंतर सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या सोबतीने जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा लावला. याच जोडीने महाडिक यांची गोकुळ मधील २५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणली. महाडिक यांचे राजकीय सहकार क्षेत्रावर पीछेहाट सुरू असताना राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. तेव्हापासून महाडिक यांचे राजकीय वजन पुन्हा वाढू लागले. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर भाजपचा जिल्ह्यातील दुसरा प्रमुख नेता म्हणून धनंजय महाडिक यांची ओळख निर्माण झाली आहे. तर सतेज पाटील यांनी दुसऱ्यांदा गृह राज्यमंत्री, पालकमंत्री पद मिळवून ताकद दाखवून दिली. अशा या बलाढ्य नेत्यांत नव्याने जुंपली आहे.

हेही वाचा… विमानसेवा अन् चिमणीवरून सोलापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा

ग्रामपंचायत निकालाने संघर्ष

ग्रामपंचायत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायतच्या निकालावरून सतेज पाटील – धनंजय महाडिक यांच्यातील संघर्षाने पुन्हा उचल खाल्ली. २१ ग्राम पंचायती पैकी१८ ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवण्याचा दावा आमदार पाटील यांनी केला. लक्षवेधी ठरलेल्या उचगाव ग्रामपंचायत मतमोजणी गैरप्रकारे झाल्याचा आरोप करून भाजपने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या घडामोडीवर भाष्य करताना सतेज पाटील यांनी ‘ राजकारणात जय, परायजय होत असतो. आम्ही लोकशाही प्रक्रिया मानणारे आहोत. दोन ग्रामपंचायतीमध्ये आमचा सरपंच झाला नाही म्हणून आम्ही मोर्चा काढला नाही,’ असा खोचक टोला धनंजय महाडिक यांना लगावला. लोकशाहीत कोणी जिंकतो. कोणी हरतो. लोकशाहीत हे चालणार. पराभव पचवावा एवढी ताकद असली पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. त्यावर धनंजय महाडिक स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. ‘ सन २०१४ मध्ये विधानसभा पराभवानंतर सहा महिने अज्ञातवासात गेले होते. त्यांनी आम्हाला पराभवाबद्दल उपदेश करू नये. आतापर्यंत अनेक पराभव स्वीकारूनच यशाच्या शिखरावर पोहचलो आहोत,’ असा प्रति टोला खासदार महाडिक यांनी आमदार पाटील यांना लगावला. मतदान झालेल्या गावात सतेज पाटील यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता, असा आरोप करून महाडिक यांनी मतदानाची फेर मोजणी व्हावी. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली जावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे. एका परीने त्यांनी पाटील यांना पुन्हा आव्हान दिले आहे.

हेही वाचा… कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण?

राजाराम कारखान्यावरून धुसफूस

गोकुळ मधील महाडिक यांच्या सत्तेला शह दिल्या नंतर सतेज पाटील यांचे पुढील लक्ष्य महाडिक यांच्या ताब्यातील राजाराम कारखाना जिंकण्याचे आहे. कारखान्यातील १३४६ सभासद अपात्र करून सतेज पाटील यांनी पहिली पायरी गाठली आहे. ‘ राजाराम कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून पावणे तीन वर्ष झाली आहेत. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी. निवडणुकीला उशीर होत असेल तर कारखान्यावर प्रशासक नेमावा, ‘अशी मागणी पाटील समर्थक माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांची भेट घेऊन केली आहे. सतेज पाटील गट या निवडणुकीसाठी आतुर झाल्याचेच हे प्रतीक होय. त्यावर महाडिक गटही सक्रिय झाला. ‘ मतदानाचा हक्क बजावणेसाठी संस्थेच्या प्रारूप व अंतिम मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी प्रारूप मतदार यादीची अर्हता ३१ मार्च २०२३ करावी अशी विनंती सभासदांनी केली आहे, या आशयाचे निवेदन त्यांनी साखर सहसंचालक यांनी दिले आहे. असे न झाल्यास मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्याबद्दल आंदोलन करण्याचा इशारा महाडिक गटाने दिला आहे. या माध्यमातून पाटील व महाडिक हे एकमेकाला शह देत असताना दुसरीकडे राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. वर्षभरात पाटील – महाडिक यांच्यात कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद येथे टोकदार राजकीय संघर्ष अटळ आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics is in full swing between satej patil and dhananjay mahadik in kolhapur print politics news asj