Prashant Kishor Bihar Election Strategy : बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज्यात यंदा तिरंगी लढत होणार आहे. गुरुवारी जन सुराज पक्षाने आपल्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाटणा येथील जन सुराज पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत निवृत्त प्रशासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, समाजसेवक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. समाजातील सर्व घटकांना एकसमान प्रतिनिधित्व देण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेनुसार ही पहिली यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती जन सुराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी दिली आहे.
पहिल्या उमेदवारी यादीत कोणाकोणाला स्थान?
निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी समाजातील विविध घटकांतील व्यक्तींना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पहिल्या यादीतील ५१ पैकी १७ उमेदवार अतिपिछड्या वर्गातील (EBC) असल्याचे उदय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जन सुराज पक्षाच्या पहिल्या यादीत इतर मागासवर्गीय समुदायातील ११ उमेदवार, सामान्य प्रवर्गातील नऊ उमेदवार, मुस्लीम समुदायातील सात उमेदवार आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील एका उमेदवाराचा समावेश आहे. त्याशिवाय सात महिलांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे. गोपालगंज जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भोरे मतदारसंघातून प्रीती किन्नर या ट्रान्सजेंडर उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
जन सुराज पक्षाच्या पहिल्या यादीत गायक पांडे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पक्षात प्रवेश केला होता. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पांडे यांनी ‘हम मोदी संगे रहब’ (आम्ही मोदींसोबत राहू) हे गाणे तयार केले होते. त्यांच्या या गाण्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. जवळपास ८० लाखांहून व्ह्यूज या गाण्याला मिळाले होते. प्रसिद्ध गणितज्ज्ञ के. सी. सिन्हा यांनाही यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ गणिताची ७० हून अधिक पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. त्याशिवाय सिन्हा यांनी अनेक विद्यापीठांचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
आणखी वाचा : Ramdas Athavale : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील बूट हल्ल्यावर रामदास आठवले भडकले; केली ‘ही’ मागणी!
राजकीय घराण्यातही वाटली तिकिटे
प्रशांत किशोर हे राजकीय घराणेशाहीवर नेहमीच टीका करताना दिसून येतात. मात्र, त्यांच्या पक्षाच्या उमेदवारी यादीत काही राजकीय घराण्यांची नावे दिसत आहेत. समस्तीपूरमधील मोरवा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या जागृती ठाकूर या प्रसिद्ध समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या नात आहेत. त्या व्यवसायाने दंतवैद्य असल्याचे सांगितले जात आहे. नालंदा जिल्ह्यातील अस्थावन विधानसभा मतदारसंघातून आर.सी.पी. सिंह यांची कन्या लता सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आर.सी.पी. सिंह हे पूर्वी जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांचे विश्वासू होते आणि ते आता जन सुराज पक्षाचे प्रमुख सदस्य आहेत
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकुर यांना अति मागास समुदायाचे (EBC) लोक विशेष आदराने पाहतात. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी मुंगेरिलाल आयोगाच्या शिफारसी लागू करून बिहारमध्ये आरक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला होता. या शिफारसींनुसार अति मागास समुदायासाठी १२ टक्के, इतर मागासवर्गीयांसाठी आठ टक्के, महिलांसाठी तीन टक्के आणि सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तीन टक्के आरक्षण देण्यात आले होते. बिहारमध्ये अतिमागास समुदायाची लोकसंख्या सुमारे ३६% असून यात ११३ समूहांचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे नितीश कुमार आणि एनडीएने या मतदारांना प्रभावीपणे आकर्षित केले आहे.
प्रशांत किशोर यांच्याकडून वकिलांना उमेदवारी
लता सिंह व्यवसायाने वकील असून, त्यांनी यापूर्वी पाटणा उच्च न्यायालयात वकिली केली आहे आणि आता त्या सर्वोच्च न्यायालयात काम करीत आहेत. माजी आमदार असलेले किशोर कुमार (२००५ मध्ये सोनबरसातून अपक्ष म्हणून विजयी) यांना सहरसा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. यदु वंश गिरी हे उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील असून, बिहार लोकसेवा आयोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण कायदेशीर लढ्यांमध्ये ते सहभागी होते. सारणमधील मांझी या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाही दिली उमेदवारी
निवृत्त पोलीस अधिकारी आणि होमगार्डचे माजी महासंचालक आर.के. मिश्रा हे दरभंगा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. छपरा मतदारसंघातून जन सुराज पक्षाने आणखी एक निवृत्त पोलीस अधिकारी जय प्रकाश सिंह यांना उमेदवारी दिली आहे. २००० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सिंह यांनी यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये सेवा दिली आहे. स्वेच्छानिवृत्तीपासून ते गेल्या वर्षभरापासून बिहारच्या तळागाळातील राजकारणात सक्रिय आहेत. त्याशिवाय जन सुराज पक्षाने आपल्या यादीत तीन डॉक्टरांसह प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त अधिकारी आणि कलाकारांनाही संधी दिली आहे.
हेही वाचा : RJD-Congress Seat Sharing : बिहारमध्ये काँग्रेसची कोडी? महाआघाडीकडून इतक्याच जागा देण्याची तयारी; कारण काय?
वैद्यकीय क्षेत्रातही केले तिकिटांचे वाटप
डॉ. अरुण कुमार, डॉ. लाल बाबू प्रसाद आणि डॉ. अमित कुमार दास हे प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. या यादीत इतरही काही महत्त्वाच्या नावांमध्ये सुनील कुमार (लौरिया मतदारसंघ), मो. परवेझ आलम (बेनीपट्टी मतदारसंघ), अफरोज आलम (अमौर मतदारसंघ), मो. शाहनवाझ आलम (बैसी मतदारसंघ), कुणाल निषाद उर्फ सोनू सिंग (प्राणपूर मतदारसंघ), शोएब खान (दरभंगा ग्रामीण मतदारसंघ), विनय कुमार वरुण (परबत्ता मतदारसंघ), कुमारी पूनम सिन्हा (नालंदा मतदारसंघ), नेहा कुमारी (नटराज मतदारसंघ) (चेनारी राखीव मतदारसंघ) आणि लक्ष्मण मांझी (बोधगया) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
जन सुराज पक्षाला किती यश मिळणार?
जन सुराजने जाहीर केलेली ५१ उमेदवारांची यादी पश्चिम चंपारण, पूर्णिया, किशनगंज, सहरसा, भागलपूर, गया आणि औरंगाबाद यांसारख्या संपूर्ण राज्यातील विविध मतदारसंघातील आहे. बिहारमध्ये आतापर्यंत कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, त्यामुळे जन सुराज हा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणारा पहिला पक्ष ठरला आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्याकडून आणखी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांसाठी राजकीय रणनीतीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणात उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पक्षाला कितीपत यश मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.