रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रचाराला हळूहळू गती येऊ लागली असली तरी महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणणे हे दोन्ही बाजूंच्या नेत्यांपुढे मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात पूर्वापार पकड असल्यामुळे शिंदे शिवसेनेने स्वाभाविकपणे इथे हक्क सांगितला. दुसरीकडे राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी हात-पाय पसरण्याच्या भाजपाच्या धोरणानुसार त्यांच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांनी सुरुवातीपासून येथे दबाव तंत्राचा वापर करून या जागेसाठी दावा केला होता. अखेर राज्यातील अन्य काही जागांप्रमाणेच येथेही शिंदे यांना भाजपापुढे नमते घ्यावे लागले. गेल्या गुरुवारी येथून राणे यांची उमेदवारी जाहीर झाली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुरुवातीपासून येथे आग्रही होते. दोन्ही सामंत बंधुंनी त्याबाबत शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण अखेर भाजपाचे डावपेच वरचढ ठरले. मात्र मधल्या काळात किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग नव्हे, तर मुंबईपर्यंत त्यांचा ‘भावी खासदार’ म्हणून अशा तऱ्हेने प्रचार चालवला होता की, त्यांना हे कटू सत्य गिळणे कठीण झाले. त्यामुळे राणे यांचे नाव जाहीर होताच सामंत यांच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्रही सुरू केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीतील कोणत्याही वादग्रस्त जागेबाबत हे स्वाभाविक असते. अशा वेळी पुन्हा नव्या दमाने सुरुवात करणे कार्यकर्त्यांना अवघड जाते. त्यांची समजूत घालून पुन्हा प्रचाराच्या कामांमध्ये जुंपणे ही जबाबदारी दोन्ही बाजूच्या नेत्यांवर येऊन पडते. त्यानुसार सामंत बंधूंनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते अभावानेच आढळले. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात मांडलीआणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ती प्रत्यक्ष दिसून आली. हे वातावरण लक्षात घेऊन त्या दिवशी संध्याकाळी स्वतः राणी यांच्यासह भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामंत बंधू यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत एकत्र बैठक केली. त्यामध्ये एकोप्याने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रविवारी पुन्हा दोन्ही बाजूच्या समितीची बैठक झाली. पण असं बैठकांमध्ये ठरवून काही घडत नसते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?

केवळ रत्नागिरी नव्हे, तर राज्यातील सर्वच लोकसभा जागांच्याबाबत भाजपाचे तथाकथित चाणक्य शिंदे गटाला वाकवण्याचा, नमवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मानहानीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सार्वत्रिक नाराजी आहे. याशिवाय खुद्द राणे आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचे सामंत बंधुंशी फारसे सख्य नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत नीलेश यांनी उदय सामंत यांच्यावर अश्लाघ्य भाषेत व्यक्तिगत टीका केली होती. स्थानिक पातळीवर भाजपाचे या निवडणुकीचे मुख्य सूत्रधार बाळ माने आणि उदय सामंत यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. गेल्या सलग चार विधानसभा निवडणुकांमध्ये सामंत यांनी माने यांचा वाढत्या मताधिक्याने पराभव केला आहे. त्यामुळे मानेही संधी मिळेल तेव्हा सामंत बंधूंवर टीकास्त्र सोडत असतात. या सगळ्या घडामोडींमुळे दोन्ही बाजूंच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये पूर्वापार वितुष्ट निर्माण झालेले आहे. ही दरी काही दिवसांमध्ये, जादुची कांडी फिरवावी तशी भरून निघत नसते. परिस्थितीच्या रेट्यामुळे नेतेमंडळी एकमेकांशी जुळवून घेतात. पण कार्यकर्त्यांचे मनोमिलन अशक्य असते. मतदानाला जेमतेम पंधरा दिवस बाकी असताना रत्नागिरीतील महायुतीच्या नेत्यांपुढे हे मोठे आव्हान आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri sindhudurg lok sabha mahayuti challenge to unite bjp and shivsena party workers print politics news css