भारताच्या राजकारणात विरोध, निदर्शने आणि आक्रमण, हल्ले यांचा इतिहास जुना आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांवर किंवा तितक्याच बड्या पदावरील नेत्यांवर शारीरिक हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने कानशिलात घटना घडली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता साप्ताहिक जनसुनावणीसाठी हजर असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. जनसुनावणीदरम्यान मुख्यमंत्र्यांना तक्रार सांगत असतानाच या तरुणाने अचानक त्यांना कानशिलात लगावली. या घटनेनंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. जनसुनावणी बंद व्हावी या उद्देशाने हा हल्ला केला असावा असा अंदाज भाजपा नेत्यांनी वर्तवला आहे. दुसरीकडे, दिल्ली न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांबाबतच्या आदेशावरून रोष व्यक्त करत हा हल्ला केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

दरम्यान, रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद आणि विरोध होऊ शकतात, मात्र हिंसाचाराला स्थान असू शकत नाही”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अलीकडेच रेखा गुप्ता यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, “राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र हल्ले करण्याची ही संस्कृती चुकीची आहे.” त्यावेळी त्यांनी इतर मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यांची उदाहरणेही दिली. मात्र, आज बुधवारी रेखा गुप्ता यांना अशाच एका हल्ल्याला सामोरं जावं लागलं आहे. याआधीदेखील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर पत्रकार परिषद, रॅली, प्रचारादरम्यान शारीरिक हल्ले झाले आहेत.

अरविंद केजरीवाल (दिल्लीचे माजी मुख्यमंत्री)

२०१४ पासून आतापर्यंत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेक, कानशिलात लगावणे, बूटफेक असे अनेक प्रकारे हल्ले झाले. २०१६ मध्ये लुधियाना इथे एका सभेत अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात केजरीवाल यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. केजरीवाल ओपन जीपमध्ये असताना एका व्यक्तीने जीपवर चढून त्यांना थोबाडीत मारली, त्या आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आलं. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. तर केजरीवाल यांनी हा हल्ला माझ्यावर नसून दिल्लीच्या जनतेवर आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती.

हिमंता बिस्वा सरमा (आसामचे मुख्यमंत्री)

२०२३ मध्ये आसाममध्ये एका आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी सरमा यांच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. गुवाहाटी आणि धुबरी भागात पाहणी करत असताना पोलिस फौजफाटा असतानाही बिस्वा यांच्यावर हा हल्ला झाला. सरमा यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या हतबलतेतून अशा घटना घडतात असे म्हटले होते.

भूपिंदर सिंग हुड्डा (हरयाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री)

२०१४ मध्ये भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या एका तरुणाने कानाखाली मारली होती. बेरोजगारीच्या ताणातून त्याने हे कृत्य केल्याचे त्यावेळी बोलले जात होते.
२०१८ मध्ये रोहतक इथे आयोजित एका सभेत हुड्डा यांच्यावर शाईफेक झाली होती. भाजपाविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या निदर्शकांच्या एका गटाने हुड्डा यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी हुड्डा यांनी खबरदारीची भूमिका घेत लोकशाहीत मतभेद असतात, पण हिंसाचार हा चुकीचाच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

वाय. एस. जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री)

२०१८ मध्ये विशाखापट्टणम विमानतळावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात रेड्डी यांच्या हातावर जखमा झाल्या होत्या. एका रेस्टॉरंट कर्मचाऱ्याने हा हल्ला केला होता. विमानतळासारख्या ठिकाणी हा हल्ला झाल्यामुळे ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती.

याव्यतिरिक्त बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. या घटना हे दर्शवतात की जाहीर कार्यक्रम, रस्त्यावर प्रचार, जनता दरबार ही ठिकाणं राजकारण्यांसाठी सर्वाधिक असुरक्षित ठरतात. सुरक्षा व्यवस्थेतील एखादी बारीकशी चूकही नेत्यांना खूप महागात पडू शकते, असे यावरून दिसून येते. दरम्यान, अशा हल्ल्यांनंतर विरोधक आणि समर्थक यांच्यातले आरोप-प्रत्यारोप आणि शा‍ब्दिक आक्रमकता दिसून येते.