अनिकेत साठे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : शिवसेना फुटीनंतर उफाळलेल्या राजकीय संघर्षात शब्दांना वेगळीच धार चढली असून परस्परांवर हल्ले चढविताना मच्छर, डेंग्यू, मीठ, भोजन, आदी कोट्यांमधून असंस्कृतपणाचे दर्शन घडत आहे. शब्दांमध्ये माधुर्य, प्रासादिकता असल्यास नाती गुंफली जातात. इथे दुभंगवण्यावर सर्व भर असल्याने दोन्ही गटांनी शब्दांचा ताळमेळ न ठेवल्याने शब्दश्चक्री अनुभवायला मिळत आहे. शिवसेना (ठाकरे गट) मुखपत्राच्या संपादकांचा सामना करताना त्यांच्याच मुशीत तयार झालेले शिंदे गटातील शिवसैनिक कुठलीही कसर ठेवत नसल्याने राजकीय पटलावर शब्दांना दारिद्र्याची, दर्जाहीन किनार लाभल्याचे चित्र आहे.

शिवसेना फुटल्यापासून राज्यात ठाकरे-शिंदे गटात चाललेल्या शाब्दीक द्वंद्वात आता नाशिकमधून नवीन भर पडत आहे. अलीकडेच शिवसेनेचे (ठाकरे गट) मनपातील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे बंड रोखण्यासाठी खा. संजय राऊत यांचे प्रयत्न फोल ठरले. या घटनाक्रमात शिंदे गटास आधीच जाऊन मिळालेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशी त्यांचा पहिला सामना रंगला होता. नाशिक लोकसभा मतदार संघात गोडसे पुन्हा निवडून येणार नाहीत, हा दावा करणाऱ्या राऊतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान गोडसे यांनी दिले होते. त्यावर राऊतांनी गोडसेंना मच्छराची उपमा देत निवडणुकीत एखादा शिवसैनिकही त्यांचा पाडाव करेल, अशा शब्दात खिल्ली उडविली. शब्दाने शब्द वाढतो. तसाच अनुभव या वादात आला. गोडसे तसे कमी बोलणारे. पण, डिवचल्यामुळे त्यांचाही तोल सुटला. अभिनेता नाना पाटेकरांच्या चित्रपटातील डायलॉग फेकत त्यांनी एक मच्छर काय करू शकतो हे राऊतांना माहित नसावे, मच्छर चावल्यावर डेंग्यू होतो. शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. आम्ही तर मावळे आहोत, असे दर्पोक्तीयुक्त स्वरात सांगितले.

हेही वाचा: राजकीय नेत्यांच्या फलकांमुळे उपराजधानीचे विद्रुपीकरण; प्रमुख ठिकाणी फलक लावण्यासाठी प्रशासनावर दबाव

प्रदीर्घ काळ एकत्रित राहिलेले दोन्ही गटातील पदाधिकारी रात्रीतून हाडवैरी बनले. परस्परांंची वैयक्तिक उणीदुणी काढण्याची स्पर्धा लागली आहे. त्यात साधनशुचिता खुंटीवर टांगली गेली. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पक्षांतर करणाऱ्यांना तुंबड्या भरणारे गद्दार, दलाल, आयाराम-गयाराम असे हिणवले. लाखो रुपये घेऊन ही मंडळी शिंदे गटात गेली. खासदार संजय राऊत यांनी नाराजांच्या तक्रारी दोन दिवसांपूर्वी जाणून घेतल्या होत्या. त्या सोडविण्याची तयारी दर्शविली. काही नाराजांनी राऊत यांच्यासोबत भोजनही केले होते. मात्र खाल्ल्या मिठाला ते जागले नाहीत, असे शब्दप्रयोग करंजकर यांनी केले. गद्दारी ज्यांच्या रक्तात भिनली आहे, त्यांना कुठपर्यंत रोखता येईल, असा त्यांचा प्रश्न होता.

ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास शिंदे गटात सहभागी झालेले माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते पुढे सरसावले. बोरस्ते हे तुलनेत सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात. पक्षांतराचे कारण त्यांनी शांतपणे मांडले. गेल्या काही दिवसांमध्ये पक्ष बदलणाऱ्यांवर अर्थकारणाचे आरोप करण्याची नवीन पध्दत रुढ झाली असून ज्यांना कायमच बाजारामध्ये विकण्याची सवय झाली आहे, त्यांच्याकडून असे आरोप होणे स्वाभाविक असल्याचा टोला लगावला. अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आहे.

हेही वाचा: माफीवरून खरगे यांनी भाजपला सुनावले

तुरुंगातून सुटल्यानंतर खासदार राऊत हे जेव्हा नाशिकला आले होते, तेव्हा त्यांना आपणच भोजनासाठी घेऊन गेलो होतो. त्यामुळे मीठ आणि भाकरीला कोण जागले ते दिसते, हा दाखला देण्यास बोरस्ते यांनाही काही वावगे वाटले नाही. सेनेतील फुटीनंतर परस्परांची उणीदुणी काढताना कठोर शाब्दीक प्रहारांनी राजकारणाची पातळी खालावल्याचे दिसत आहे. शब्द चातुर्याऐवजी शब्दच्छल करण्यात धन्यता मानली जात असून शब्दांची श्रीमंती मात्र लोप पावली आहे. शब्द हे शस्त्र मानले जाते. त्यांचा जपून वापर होणे अभिप्रेत असते. राजकीय पटलावरील शाब्दीक कुरघोडीचे कुणाला शल्यही वाटत नसल्याचे विदारक चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena split political conflict between thackeray and shinde group in nashik criticism of each other is seen uncivilized print politics news tmb 01