जालना : जालना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आतापर्यंत सहा मंत्र्यांनी जालना जिल्ह्याचा दौरा केला. बहुतेक ही पाह‌णी प्रमुख रस्त्यांच्या बाजूस झालेल्या पिकांच्या नुकसानीचीच झाली. कमी वेळात धावपळ करून ही पाहणी झाली आहे. दौरे झाले पण मदतीचे काय, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.

पिकहानीच्या पाहणीसाठी छत्रपतीसंभाजीनगर ते जालना दरम्यान बदनापूर शहराजवळ कृषी मंत्र्यांनी जालना या प्रमुख रस्त्यापासून जवळ असलेल्या सोमगणा परिसराची निवड केली होती. त्यानंतर भरणे यांनी सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वडिगोद्री गावाच्या परिसरात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यानच्या काळात त्यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये सभावेष करण्यासाठी जालना शहरात बेमुदत उपोषणास बसलेले दीपक बोहाडे यांची भेट घेतली. याच दिवशी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सकाळी परतूर तालुक्यातील गोळेगाव परिसरात नुकसानीची पाहणी केली आणि घननसावंगी तालुक्यातील कांही गावांना भेटी देऊन अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात पीकांच्या नुकसानीची पाहणी केली.

जलना दौऱ्यावर आलेले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दौऱ्यात इन्क्युबेशन केन्द्राचे उद्‌घाटन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत बैठक झाली. या सर्व व्यस्ततेत छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेलगाव परिसरात त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. २६ सप्टेंबर रोजी दुपारी जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जालना शहरातील तलावातून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याच्या संदर्भात स्थानिक आमदार अर्जुन खोतकर आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर जालना शहराजवळील रोहणवाडी आणि पानशेन्द्रा परिसरात पीकांच्या नुकसानीची पाह‌णी केली. दरम्यानच्या काळात त्यांनी जालना शहरात धनगर आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली.

केन्द्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरात पीकपाहणी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा गावाच्या परिसरात अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना शहराजवळ असलेल्या कडवंची गावातील पिकांची पाहणी केली.

नियोजित दौऱ्यातील वेळेप्रमाणे मंत्र्याच्या दौरे कार्यक्रम झाले नाहीत. मंत्री लोढा यांचा दौरा साडेतीन तासांचा होता आणि त्यातही अतिवृष्टीच्या पाहणीशिवाय अन्य कार्यक्रम आधिक होते. मंत्री सामंत यांच्या मूळ दौरा चार तासांचा होता. पंकजा मुंडे यांचा मूळ दौरा पाच तासांचा होता. कृषी मंत्री भरणे यांचा मूळ दौरा अडीच तासांचा होता. लोढा यांच्या दौऱ्याची तर स्थानिक कृषी विभागास माहितीही नव्हती.