अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक खांदेपालट केला असून शहराध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. नितीन धांडे आणि जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी रविराज देशमुख, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत अमरावती ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष अशी दोन पदे होती. आता मेळघाटसाठी स्वतंत्र अध्यक्षपद देण्यात आले आहे.
तिवसा, मोर्शी, धामणगाव रेल्वे, बडनेरा या विधानसभा क्षेत्रासाठी रविराज देशमुख हे जिल्हाध्यक्ष असतील तर मेळघाट, अचलपूर, दर्यापूर या तीन विधानसभा मतदारसंघासाठी प्रभुदास भिलावेकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. अमरावती विधानसभा व बडनेरा मतदारसंघातील शहरी भागासाठी शहराध्यक्ष म्हणून डॉ. नितीन धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराध्यक्ष प्रवीण पोटे आणि जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या पदांची धुरा कुणाच्या खांद्यावर येणार, याविषयी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. या दोन्ही पदांसाठी वेगवेगळी नावे चर्चेत असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी धक्का दिला आहे.
प्रवीण पोटे आणि डॉ. अनिल बोंडे यांची जुलै २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याच कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. त्यामुळे प्रवीण पोटे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता, पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. प्रवीण पोटे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला आहे. शहराध्यक्षपद प्रवीण पोटे यांच्याकडेच कायम रहावे, यासाठी पोटे यांच्या गटाने जोरकस प्रयत्न केले, पण त्यात यश मिळू शकले नाही.
नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे हे येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. २०२० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, पण डॉ. धांडे यांना पराभव पत्करावा लागला होता.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिवसा मतदारसंघातून लढत देण्याची जय्यत तयारी केली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता, पण राजेश वानखडे यांना उमेदवारी मिळाली आणि रविराज देशमुख यांना माघार घ्यावी लागली. प्रभुदास भिलावेकर यांनीही विधानसभा निवडणुकीच्या वेळी तलवार म्यान केली होती. दोघांनाही माघारीचे बक्षीस मिळाले आहे.
खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात भाजपने पक्षसंघटनात्मक बांधणी हाती घेतली असताना आता नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. भाजपमध्ये अनेक गटांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. राणा यांच्या कार्यशैलीमुळे भाजपमधील एक गट नाराज असताना आता प्रवीण पोटे यांच्याकडील पद काढून घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. आगामी निवडणुका या विविध गटांसाठी परीक्षाच ठरणार आहेत.