TMC MP Jawhar Sircar : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांनी कोलकाता घेटनेच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

राजीनामा देताना जवाहर सरकार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप करत पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचाराबाबतही चिंता व्यक्त केली आहे. तसेच राजीनामा देताना त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना एक पत्र लिहिलं. त्यांनी पत्रात लिहिलं की, “आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये घडलेल्या भयंकर घटनेनंतर मी महिनाभर धीराने सहन केलं. ममता बॅनर्जींनी जुन्या शैलीत आंदोलक डॉक्टरांसोबत थेट हस्तक्षेपाची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. आता सरकार जे काही पावलं उचलंत आहे, त्याला उशीर झालेला आहे. तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आता मला खासदार म्हणून राहण्याची इच्छा नाही”, असं जवाहर सरकार यांनी पत्रात म्हटलं.

हेही वाचा : नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

दरम्यान, जवाहर सरकार यांनी तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांचा पुढचा निर्णय काय असेल? तृणमूल काँग्रेस पक्ष का सोडला? दुसऱ्या पक्षात जाणार का? यासह आदी महत्वाच्या मुद्यांवर जवाहर सरकार यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. यावेळी तुम्ही तृणमूल काँग्रेसचा राजीनामा का दिला? तसेच राज्यसभेचं सदस्यपदही सोडणार आहात का? असा प्रश्न त्यांना विचारला असता जवाहर सरकार म्हणाले, “मी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय हा माझा वैयक्तिक आहे. मी तीन वर्षे खासदार म्हणून काम केलं. मला वाटतं ते माझ्यासाठी पुरेसं आहे. कोलकाता येथील आर.जी.कर रुग्णालयातील प्रकरणाच्या सरकारच्या हाताळणीवर माझा तीव्र आक्षेप आहे”, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मी माझ्या पत्रात म्हटल्याप्रमाणे राज्यातील व्यवस्थापन अधिक चांगलं होऊ शकतं. मात्र, या प्रकरणात तृणमूल काँग्रेस खूप बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. याचं कारण म्हणजे कोलकाता पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं असं पक्षाचे अनेक खासदार सांगत असल्याचं आपण पाहतो. मात्र, सीबीआयला यामध्ये अद्याप कोणताही नवा सुगावा लागला नाही. यामध्ये राजकारण आणलं जात आहे. पण मला तसं करायचं नाही. मी फक्त खासदारीच सोडत नाही तर राजकारणही सोडत आहे. आता यापुढे मला एक सामान्य माणूस म्हणून समाजात राहायचं आहे. मी राजकीय विचार करणार नाही. कोलकाता येथील डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण नीट हाताळलं गेलं नाही. या प्रकरणानंतर मी ममता बॅनर्जी यांना काही पावलं उचलण्याचा सल्ला दिला होता, असं जवाहर सरकार यांनी सांगितलं.

हेही वाचा : Dispute in Mahayuti: ‘चोराच्या उलट्या बोंबा’, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय होती? या प्रश्नांवर बोलताना जवाहर सरकार म्हणाले की, या गोष्टी खासगी राहिल्या पाहिजेत.” तुम्ही तृणमूल काँग्रेसमधील तुमच्या सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली का? यावर ते म्हणाले की, “सहकाऱ्यांशी चर्चा करण्यासारखे काही नाही. मी एकटाच आलो आणि एकटाच चाललो आहे.” कोलकाता आर.जी.करमध्ये घडलेल्या या प्रकरणासंदर्भात सरकारने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं त्यावरून पक्षातील आणखी काही सहकाऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे का? या प्रश्नावर जवाहर सरकार म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. मात्र, लोक याबाबत दबावात आहेत. मी याबाबत जास्त काही बोलू इच्छित नाही. पण माझं म्हणणं आहे की, यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्वरित सुधारणा होणं आवश्यक आहे. ही सुधारणा ममता बॅनर्जी करू शकतात.”

आंदोलकांपर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे का? यावर बोलताना ते म्हणाले, होय, मुळात ते आहेच. कारण एकीकडे सीबीआय तपास करत आहे. न्यायाची मागणी सुरु आहे. दुसरीकडे शहर आणि राज्य ठप्प आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विनंती केली की कृपया डॉक्टरांशी बोला, संवाद साधा. मी असंही म्हटलं होतं की, तुम्हीच राज्य वाचवू शकता.” तुमचे सहकारी आणि पक्षाचे सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनीही या घटनेवर आपले मत उघडपणे मांडले. मग तृणमूल काँग्रेस पक्षात अस्वस्थतेचे वातावरण आहे का? यावर बोलताना ते म्हणाले, “मलाही असेच वाटते. पण कोणत्याही पक्षातील लोक या विषयांवर बोलत नाहीत.”

तुमची पुढची योजना काय आहे?

कोलकाता घेटनेच्या निषेधार्थ जवाहर सरकार यांनी तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यसभेचा राजीनामाही देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आता पुढे तुमची योजना काय? असा प्रश्न त्यांना विचारला असता जवाहर सरकार म्हणाले, काहीही नाही. मी सामान्य माणूस आहे. मी खूप लिहितो, मी खूप गोष्टीचं निरिक्षण करतो. मी ४१ वर्षे सर्व अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. मग त्यामध्ये राजकारण, विद्यार्थी राजकारण, या गोष्टींबद्दल माझी मते आहेत आणि मी ती व्यक्त करतो. मलाही अनेक अडचणी आहेत. पण मी एक मुक्त माणूस होऊ इच्छितो.” दरम्यान, तुम्ही इतर कोणत्याही पार्टीत जाण्याचा विचार करत आहात का? या प्रश्नावर जवाहर सरकार म्हणाले, “नाही, कधीच नाही. मला राजकारण नको आहे.”