Top Five Political News in Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत राजकीय क्षेत्रात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. बिहार काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एआय पुरस्कृत व्हिडिओ तयार केल्यानंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले. भारत-पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांवर टीकेचा भडिमार केला. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि भाजपाचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यात एका बैठकीत खडाजंगी झाली. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मोदींच्या आईचा काँग्रेस पुरस्कृत AI व्हिडीओ
आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना लक्ष्य करीत आहे. आज बिहार काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय पुरस्कृत व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये मोदींच्या स्वप्नात त्यांच्या आई त्यांच्यावर ओरडताना दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी बिहार काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. अशा प्रकारचे एआय आधारित व्हिडिओ तयार करून काँग्रेस राजकारणातील खालचा स्तर गाठत असल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान करीत आहे, असा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे, तर आम्ही सदरील व्हिडिओ कुणाचाही अनादर करण्यासाठी तयार केलेला नाही, असं स्पष्टीकरण बिहार काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यांवरून उद्धव ठाकरेंचा संताप
आशिया क्रिकेट चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने हिरवा कंदील दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपासह पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडा आणि विदर्भातील पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर भाष्य केलं. “पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे ते म्हणाले होते, पण, आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट का खेळता? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच या सामन्याच्या दिवशी येत्या १४ सप्टेंबर आक्रमकपणे आंदोलन करा, महिला आघाडीने पंतप्रधानांना सिंदूर पाठवावा, असेही आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले.
आणखी वाचा : BJP-RSS Relations : भाजपाला आता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हवाहवासा का वाटतोय? कारण काय?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ-जरांगेंमध्ये जुंपली
राज्य सरकारने काढलेल्या शासकीय अध्यादेशाला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकांवर टीकेचा प्रहार केला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको आहे का? असा प्रश्न भुजबळांनी आज माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रातही मराठा समाजाचे मंत्री होते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा असल्याचं भुजबळ म्हणाले. त्यांच्या या प्रश्नाला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं. “मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असू तुम्हाला तर रडकुंडीला आणलं ना? तुमचा जो उद्देश होता, मराठा समाजाला आरक्षण मिळू न द्यायचा, त्याच्यावर तर मी पाणी फेरलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही आरक्षणात गेला”, असा टोला जरांगेंनी लगावला.
राहुल गांधी आणि भाजपाच्या मंत्र्यामध्ये बैठकीत वाद
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी १० आणि ११ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या दौरा केला. यावेळी त्यांनी रायबरेली येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत भाजपाचे राहुल गांधी आणि भाजपाचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्या खडाजंगी झाली. राहुल गांधी म्हणाले की, मी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत आहे. तुम्हाला(दिनेश प्रताप सिंह) काही सांगायचे असेल तर आधी विचारा, मग मी तुम्हाला बोलण्याची संधी देईन. त्यांच्या या विधानावरून मंत्री दिनेश संतापले आणि दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला. तुम्ही निश्चितच अध्यक्ष आहात, पण जे काही बोलत आहात ते मी ऐकण्यास बांधील नाही, असं उत्तर दिनेश सिंह यांनी राहुल गांधींना दिलं. या बैठकीला अमेठीचे खासदार केएल शर्मादेखील उपस्थित होते. तेदेखील राहुल गांधींसह दिनेश प्रताप सिंह यांच्याशी वाद घालताना दिसून आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमधेही कामाच्या तासांमध्ये वाढ; कोणकोणत्या राज्यांनी केले कामगार कायद्यात बदल?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
रशियाकडून खजिन तेलाचे खरेदी सुरूच ठेवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतापून भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादलं. त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्वच भारतीय वस्तूंवरील एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला. आज पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफवर प्रतिक्रिया दिली. “हे शुल्क भारताच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीचे परिणाम आहेत. मनात जर आपलेपणाची भावना असेल तर, सुरक्षेचा प्रश्नच येत नाही. दुसरा मोठा झाला, तर माझे काय होईल, ही भीती जगातील इतर देशांच्या मनात आहे. भारत जर मोठा झाला तर आमचे काय होईल, ही भीती जगातील काही देशांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर टॅरिफ लागू केलं आहे,” असं भागवत यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. “तुकाराम महाराज म्हणत होते, कोणी वंदा कोणी निंदा | आम्हा स्वहिताचा धंदा. जगाचे भले करणे यात आमचे स्वहित असून तो आमचा स्वार्थ आहे. मात्र स्वतःला शरीर मन. बुद्धीत कैद करून बसले तर हेच माणसा माणसातील आणि देशा – देशातील भांडणाचे कारण ठरते,” असंही ते यावेळी म्हणाले.