रत्नागिरी – भाजपाच्या वाटेवर असलेले वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश कोकणात चर्चेचा विषय बनला आहे. भाजपने त्यांचा प्रवेश रोखल्याने शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा वैभव खेडेकर यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची खुवे आवतण दिल्याने नाराज वैभव खेडेकर काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपने वैभव खेडेकर यांना पक्षप्रवेशाचे गाजर दाखवून त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर टाकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेले खेडेकर यांचा ठरलेल्या ४ सप्टेंबर या तारखेला होणारा भाजप पक्ष प्रवेश दोनदा रद्द करण्यात आला. मात्र दस-याच्या मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश होणे अपेक्षित होता. तरीही हा पक्ष प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. याचे कारण आजही गुलदस्त्यात आहे. पक्ष प्रवेशासाठी मुंबई येथील भाजपाच्या कार्यालयात आपल्या ताफ्यासह पोहचलेल्या खेडेकरांना पक्ष प्रवेश न होता माघारी फिरावे लागले होते.
भाजपाच्या पक्ष कार्यालयात भाजपचा एकही नेता उपस्थित नसल्याने खेडेकर व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. याबाबत बोलताना शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश असा रद्द होणे म्हणजे त्यांच्या खच्चीकरणासारखे आहे. अशी गोष्ट घडू नये, ही माझी भूमिका असून शिवसेना पक्षात खेडेकर आले तर असा प्रकार होणार नाही, याची आपण हमी देतो. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असेही सामंत यांनी सांगून एक प्रकारे खेडेकर यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी खेडेकर यांचे कौतुक करत, वैभव खेडेकर हे समाजामध्ये तळागाळापर्यंत काम करणारे व्यक्तिमत्व असून ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, असे सांगितले.
वैभव खेडेकर यांना भाजप पक्षाकडून टाळण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आता मंत्री उदय सामंत यांनी खेडेकर यांना प्रवेशासाठी शिवसेनेची दारे खुली असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र या सगळ्या घडामोडी नंतर नाराज झालेले वैभव खेडेकर कोणता निर्णय घेणार याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र वैभव खेडेकर यांनी जर शिवसेना पक्षात प्रवेश केला तर भाजपचे मंत्री नीतेश राणे यांना हा मोठा झटका असणार आहे. वैभव खेडेकर हे याआधीच शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुर्ण विराम देत, खेडेकर यांना भाजपाची ऑफर देवून शिवसेनेच्या तोंडचा घास मंत्री नीतेश राणे यांनी पळविला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे पुन्हा ही संधी चालून आल्याने मंत्री उदय सामंत यांनी खेडेकर यांना पुन्हा ऑफर देवून मंत्री नीतेश राणे यांना मात देण्याची संधी साधली आहे. मात्र शिवसेनेच्या या ऑफर वर वैभव खेडेकर काय निर्णय घेणार? हे ही पहाणे तितकेच महत्वाचे ठरणात आहे.