सांगली : दीड खासदार, आठ विधानसभेचे आमदार आणि ११ तालुक्याच्या जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांचे जिल्हा प्रमुख वाळवा तालुक्यातच आहेत. याशिवाय शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना या संघटनांचे राज्य नेतृत्व तर वाळव्याकडे आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही आमदार जयंत पाटील यांच्या रूपाने वाळव्याच्या मुठीत आहे. पक्ष संघटनेत महत्वाची पदे वाळवा तालुक्यातच असल्याने सत्तेचा समतोल कसा साधला जात असेल ते राजकीय नेत्यांनाच ज्ञात. राजकारणात वाळव्याचा नाद अख्ख्या जिल्ह्यात कुणाला जमतच नाही असा तर याचा अर्थ नसेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपने नुकत्याच जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी कडेपूरच्या देशमुख वाड्यावरील दोघा देशमुख बंधूंनी मोर्चेबांधणी केली होती. याशिवाय आणखी काही मंडळी जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रयत्नशील असताना या सर्वांना वगळून वाळवा तालुक्यातील पेठच्या सम्राट महाडिक यांना ही संधी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारीवर त्यांचा प्रभावी दावा होता. कारण तत्पुर्वी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष मैदानात उतरून ४५ हजार मते घेतली होती. यामुळे त्यांचा दावा प्रबळ होता. मात्र, विधान परिषदेच्या बोलीवर काँग्रेस सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या कोकरूडच्या सत्यजित देशमुखांचे राजकीय पूनर्वसन करण्याचा शब्द भाजपने दिला होता. तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडली. यामुळे त्यांना आमदारकीची संधी दिल्याने वंचित राहिलेल्या महाडिक यांचे राजकीय पूनर्वसन करण्याची संधी साधत कडेपूरच्या दोन्ही देशमुखांना सबुरीचा सल्ला पक्षाने दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे. राज्य स्तरावरील नेतृत्व करत असताना घरच्या मैदानावर आपलाच म्हणजे घरचाच माणूस जिल्हाध्यक्ष असावा या हेतूने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद सोपवण्यात आले आहे. त्यांच्याकडे पद आल्यापासून विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी फारसी चमकदार दिसली नसली तरी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यामुळे उठावदार दिसण्याचीही शक्यता कमीच म्हणावी लागेल. कारण जिल्ह्याच्या राजकारणात जे निर्णय घेतले जातील ते साहेबांना बाजूला ठेवून असे त्रिवार होणे नाही असेच म्हणावे लागेल.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात दाखल होत थेट मैदानात उतरलेल्या निशीकांत भोसले-पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आमदार पाटील यांच्या राजकीय संस्थानाला धडका देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असून विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आमदार पाटील यांच्या मताच्या फरकाचे गणित लाखाचे बारा हजारापर्यंत खाली आणले. यामुळे त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांनी वीस वर्षांपूर्वीचा दुष्काळी फोरमला खतपाणी घालून जिवंत केला आहे. त्यांच्या पुढाकाराने चार माजी आमदार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात सामील झाले आहेत.

शिवसेना शिंदे पक्षाचे एक जिल्हाप्रमुख पद आनंदराव पवार यांच्याकडे तर दुसरे प्रमुख पद सांगलीचे महेंद्र चंडाळे यांच्याकडे आहे. पवार इस्लामपूर-मुंबई वगळता अन्यत्र फारसे कुठे पक्ष कार्यासाठी दिसतच नाहीत, तर चंडाळे सांगलीच्या बाहेर पडत नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पद चिकुर्डेचे अभिजित पाटील यांच्याकडे आहे. ते जिल्ह्यात फारसे कुठे फिरकतच नाहीत.

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या पक्षांची जिल्हाप्रमुख पदे वाळवा तालुक्यातच केंद्रित झाली आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय तडजोडी करण्याबरोबरच उमेदवारी देण्यातही वाळवा तालुका महत्वाचा ठरणार आहे. एकेकाळी राज्यस्तरावर राजकीय महत्व असलेल्या सांगलीचे महत्व आता वाळवा तालुक्यापुरते मर्यादित तर झाले नाही ना अशी शंका राजकीय निरीक्षक व्यक्त करत असतील तर वावगे काय?