Rahul Gandhi security protocol violation केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) राहुल गांधींवर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. त्यावरून भाजपाने राहुल गांधी यांना घेरले आहे. भाजपाने आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले नाही. मात्र, राहुल गांधींची भाजपाविरोधात ‘मतचोरी’ मोहिम सुरु असताना हे पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, असे म्हणत काँग्रेसने पलटवार केला आहे.

भाजपानुसार, सीआरपीएफने राहुल गांधींच्या इटली, व्हिएतनाम, दुबई, कतार, लंडन व मलेशिया यांसारख्या देशांच्या दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. विविध माध्यमांनी उल्लेख केलेल्या पत्राबाबत ‘न्यूज १८’ने सीआरपीएफशी संपर्क साधला; पण सीआरपीएफने यावर मौन बाळगले असून, अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. नेमका हा वाद काय? जाणून घेऊयात…

राहुल गांधींनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले?

राहुल गांधी वैयक्तिक आणि राजकीय कामांसाठी अनेकदा परदेशांत जातात. त्यांना ‘झेड प्लस’ (Z plus) श्रेणीची सर्वोच्च सुरक्षा आहे. त्यामध्ये अॅडव्हान्स सिक्युरिटी लिआजॉन (ASL) सशस्त्र संरक्षणाचा समावेश आहे. जेव्हा ते प्रवासात असतात, तेव्हा १० ते १२ सशस्त्र सीआरपीएफ कमांडो त्यांच्या सुरक्षेचे काम करतात. एएसएलचा एक भाग म्हणून, हे दल त्यांच्या भेटीच्या ठिकाणांचे आधीच सर्वेक्षण करते.

सीआरपीएफच्या पत्राबद्दल बातम्यांमध्ये काय?

वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने बुधवारी (१० सप्टेंबर) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना दोन पत्रे पाठवली आहेत. या पत्रांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलच्या उल्लंघनावर भर देत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. ‘एनडीटीव्ही’ने प्रकाशित केलेल्या एका वृत्तात सीआरपीएफच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुख सुनील जुने यांनी खरगे यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. या पत्रात आरोप करण्यात आला आहे की, राहुल गांधी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला गांभीर्याने घेत नाहीत. कारण- ते कोणालाही न कळवता, परदेशात प्रवास करीत आहेत. ते सीआरपीएफच्या ‘यलो बुक’मध्ये नमूद केलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सीआरपीएफने राहुल गांधींच्या इटली (३० डिसेंबर ते ९ जानेवारी), व्हिएतनाम (१२ ते १७ मार्च), दुबई (१७ ते २३ एप्रिल), कतार (११ ते १८ जून), लंडन (२५ जून ते ६ जुलै) व मलेशिया (४ ते ८ सप्टेंबर) येथील परदेशी दौऱ्यांचा उल्लेख केला आहे. सीआरपीएफने कथितपणे राहुल गांधींना भविष्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या बाजूने होणाऱ्या या चुकांमुळे व्हीव्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेची परिणामकारकता कमी होते आणि ते संभाव्य धोक्यांच्या संपर्कात येऊ शकतात, असेही त्यात म्हटले आहे.

‘यलो बुक’ प्रोटोकॉल काय आहे?

भाजपाने राहुल गांधींवर ‘यलो बुक’ प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल विशेषतः टीका केली आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आरोप केला आहे की, काँग्रेस नेते त्यांच्या हालचालींविषयी माहिती किंवा पूर्वसूचना देत नाहीत. ‘यलो बुक’ प्रोटोकॉलनुसार, उच्च श्रेणीच्या सुरक्षा कवचाखाली असलेल्या व्यक्तींना त्यांच्या हालचालींची त्यांच्या संरक्षणासाठी नियुक्त केलेल्या सुरक्षा पथकाला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य ती सुरक्षा व्यवस्था तैनात करता येते.

“सीआरपीएफने राहुल गांधींकडून सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे सांगितले. ‘यलो बुक’ प्रोटोकॉलनुसार, उच्च श्रेणीच्या सुरक्षेखाली असलेल्या व्यक्तींना त्यांच्या हालचालींची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. राहुल ते करीत नाहीत,” असे मालवीय यांनी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, इतर भाजप नेत्यांनी याला गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले असून, राहुल गांधींच्या परदेशातील कृतींबाबत संशय व्यक्त केला आहे. “ते भारताच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.

“राहुल गांधी नेमके काय लपवत आहेत? परदेश दौऱ्यांदरम्यान राहुल गांधींकडून सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे सीआरपीएफने उघड करणे ही गंभीर बाब आहे. या संशयास्पद परदेशी दौऱ्यांमध्ये राहुल गांधी कोणाच्या आदेशांचे पालन करीत आहेत? राहुल गांधी भारताच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत”, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

काँग्रेसने या प्रकरणावर अद्याप अधिकृत टिप्पणी केली नसली, तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी सीआरपीएफच्या पत्राच्या वेळेवर आणि ते सार्वजनिक करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “सीआरपीएफच्या पत्राची वेळ आणि त्याची त्वरित सार्वजनिक प्रसिद्धी यांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या सहभागातून भाजपाने केलेल्या मतचोरीविरोधात आवाज उचलत असताना हे पत्र आले आहे. विरोधी पक्षनेत्यांना घाबरवण्याचा हा एक छुपा प्रयत्न आहे का, राहुल गांधी आणखी सत्य उघड करणार आहेत. त्यामुळे सरकार घाबरले आहे का” असा प्रश्न खेरा यांनी उपस्थित केला.