Ranjitsinh Naik Nimbalkar Latest News : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसची साथ सोडून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेला माढा लोकसभा मतदारसंघ हिरावून घेण्यासाठी भाजपाने त्यांना पक्षात घेतले होते. त्यावेळी निंबाळकर यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत या मतदारसंघातून विजयही मिळवला. आता सहा वर्षांनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांच्यामुळे भाजपाला अडचणीत आणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून महाविकास आघाडीने भाजपासह त्यांच्या माजी खासदारावर टीकेची झोड उठवली आहे.
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने त्यांना पराभूत केले. या पराभवानंतर निंबाळकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले नेतृत्व पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याआधीच महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा धोक्यात आली आहे. निंबाळकर हे अडचणीत आल्याने भाजपासमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे, कारण आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यात पक्षाची मदार त्यांच्यावरच अवलंबून आहे.
देवेंद्र फडणवीसांनी केली पाठराखण
विरोधकांकडून राजकीय कोंडी होत असताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी फलटणचा दौरा केला. यावेळी त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वैयक्तिकरित्या क्लीनचिट दिली. “आजकाल प्रत्येक गोष्टीत राजकारण मिसळले जाते. रणजितदादा आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांना कोणत्याही कारणाशिवाय या प्रकरणात ओढले जात आहे. या प्रकरणात दोघांच्या सहभागाबद्दल मला थोडीही शंका असती, तर मी फलटणला आलोच नसतो,” असे फडणवीसांनी स्पष्ट केले. तसेच महिला डॉक्टरच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये काय म्हटले?
- २३ ऑक्टोबर रोजी फलटण तालुक्यातील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
- २८ वर्षीय मृत डॉक्टर ही मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी होती. आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर लैंगिक छळाचा आणि बलात्काराचा आरोप केला होता.
- तसेच घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्याकडून आपला मानसिक छळ होत असल्याचे पीडितेने म्हटले होते.
- हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी या दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली.
- मात्र, या घटनेनंतर भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर वादाच्या भोवऱ्यात सापडले.
- या वर्षाच्या सुरुवातीला पीडित महिलेने कथितरित्या लिहिलेल्या एका पत्रात माजी खासदाराच्या दोन खासगी सचिवांचा उल्लेख केला होता.
- एका प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय अहवालात बदल करण्यासाठी दोघेही आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप पीडितेने केला होता.
- याच कारणामुळे भाजपा आणि निंबाळकर यांचे नाव या संपूर्ण प्रकरणात ओढले गेले.
- दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले.
- “माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, मलाही दोन मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा नाव जोडले जाते, तेव्हा मनाला वेदना होतात,” असे निंबाळकर म्हणाले.
अंबादास दानवे यांनी काय आरोप केला?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अंबादास दानवे यांनी मृत महिला डॉक्टरने लिहिलेल्या एका पत्राची प्रत समाजमाध्यमांवर शेअर करीत रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर यांच्यावर टीकेचा भडिमार केला. मृत तरुणीने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात साताऱ्यातील माजी खासदार असा स्पष्ट उल्लेख केल्याचे दानवे यांनी म्हटले. “या प्रकरणात राजकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांचा दबाव संबंधित तरुणीवर होता. हे दिघे मिळून तेथील यंत्रणा चालवतात, चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, असा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. गृहमंत्र्यांच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत”, अशी टीकाही दानवे यांनी केली.
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनीही महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून संताप व्यक्त केला. “बलात्कार आणि छळाला कंटाळून महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण येथील एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी घटना आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक डॉक्टर मुलगी, भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली”, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
भाजपाच्या नेत्यांची भूमिका काय?
भाजपातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना या प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस म्हणाले, “जर या प्रकरणात निंबाळकर किंवा त्यांच्या सहाय्यकांचा सहभाग सिद्ध झाला, तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी.” अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेचा तपास एसआयटीकडे (विशेष तपास पथक) सोपवण्याची मागणी केली. भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आमदार धस आणि धनंजय मुंडे यांच्यात यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाद झाला होता. त्यावेळी धस यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेमुळेच मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, पक्षाचे प्रभावशाली नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. या अंतर्गत वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करावा लागला. अखेरीस भाजपाने निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याच्या रागातून मोहिते पाटील यांनी पक्ष सोडला. त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना पराभूत करून भाजपाला मोठा धक्का दिला.
