Who is IAS officer Fouzia Tarannum : मागील काही दिवसांपासून भाजपाचे नेते महिला अधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह विधानं करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता कर्नाटकातील भाजपा आमदार एन. रविकुमार यांनी मुस्लीम आयएएस फौजिया तरन्नुम यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केलं आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भाजपा आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोण आहेत फौजिया तरन्नुम? भाजपा आमदाराने त्यांच्यावर काय टिप्पणी केली? याबाबत जाणून घेऊ…

फौजिया तरन्नुम कोण आहेत?

कर्नाटकतील बंगळुरू शहरात जन्मलेल्या फौजिया तरन्नुम या २०१५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या उपआयुक्त (Deputy Commissioner) आणि जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. फौजिया यांनी त्यांचं प्राथामिक शिक्षण बंगळुरूमध्येच पूर्ण केलं. ज्योती निवास महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतल्यानंतर फौजिया यांनी बंगळुरूच्या क्राइस्ट महाविद्यालयात फायनान्समधून एमबीए केलं. एका खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. २०११ मध्ये फौजिया यांची भारतीय महसूल सेवा (IRS) मध्ये निवड झाली होती. मात्र आयएएस अधिकारी होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती.

२०१४ मध्ये फौजिया यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएसची ३१ वी रँक मिळवली. सार्वजनिक सेवेतील योगदानामुळे आयएएस फौजिया तरन्नुम यांना त्यांना ‘एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्कार देखील मिळाला आहे. सार्वजनिक प्रशासनातील चांगल्या कामगिरीबद्दल यावर्षी जानेवारी २०२५ मध्ये फौजिया तरन्नुम यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस’ या पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या २२ अधिकाऱ्यांमध्ये फौजिया यांचा समावेश होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादी व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

आणखी वाचा : Operation Sindoor : संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वाद का निर्माण झाला?

भाजपा आमदाराने IAS फौजिया यांच्यावर काय टिप्पणी केली?

कर्नाटकमध्ये सध्या भाजपा विरुद्ध काँग्रेस असा राजकीय सामना सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवाडी नारायणस्वामी यांनी कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत नारायणस्वामी यांना घेराव घातला. इतकंच नाही तर, सरकारी अतिथिगृहात बंदिस्तही करण्यात आलं. काँग्रेस नेत्यांच्या या कृतीविरोधात बोलताा रविकुमार यांनी कलबुर्गी येथील उपायुक्त फौजिया तरन्नुम यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं. त्या काँग्रेस सरकारसाठी काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. “फौजिया पाकिस्तानातून आल्या आहेत की, येथील आयएएस अधिकारी आहेत हे मला माहीत नाही. तुमच्या टाळ्या पाहून असे वाटते की, त्या खरोखरच पाकिस्तानातून आल्या आहेत,” असं एन. रविकुमार यांनी म्हटलं.

आयएएस संघटनेकडून भाजपा आमदाराचा निषेध

फौजिया तरन्नुम यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आयएएस संघटनेनं भाजपा आमदार एन. रविकुमार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याविषयी गैरजबाबदार व आक्षेपार्ह विधान केलं आहे, त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आयएएस संघटनेनं केली. आमदार रविकुमार यांनी फौजिया यांच्याविरोधात निराधार, अन्यायकारक व कोणत्याही तर्काशिवाय विधाने केली आहेत. अशा प्रकारच्या खोट्या व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे केवळ निष्ठावान शासकीय अधिकाऱ्यांचा अपमान होतोच, पण त्यांना मानसिक त्रास होतो,” असं संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. दुसरीकडे, फौजिया तरन्नुम यांनी मात्र या वादात थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

हेही वाचा : MLAs suspended : ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने ‘त्या’ दोन आमदारांना पक्षातून का काढलं?

काँग्रेसची भाजपावर जोरदार टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आमदार रविकुमार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. भाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याविषयी केलेलं विधान हे असह्य आणि द्वेष पसरवणारे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनीही रविकुमार यांच्या वक्तव्यावर टीका केली “देशभरातील भाजपा नेते ज्या प्रकारची भाषणे करतात, ते पाहिल्यावर त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. एका आदरणीय अधिकाऱ्यावर असे आरोप करणे अस्वीकार्य आहे. “जे लोक स्वतःच्याच नागरिकांबद्दल असे बोलतात, त्यांना आपण खरे भारतीय म्हणू शकतो का? ते स्वतःच समाजविरोधी आहेत,” असं प्रियांक खरगे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी भाजपा आमदार रविकुमार यांच्याविरोधात स्टेशन बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, चौहेबाजूने टीकेचा भडीमार झाल्यानंतर भाजपा रविकुमार यांनी त्यांच्या वक्तव्यावर पश्चताप व्यक्त केला आहे. माझ्या तोंडातून चुकीचे वक्तव्य निघाले होते, असं म्हणत त्यांनी आपली चूक मान्य केली आहे.