शिरूर : पिंपरखेड येथे बिबट्याने दिवसाढवळ्या केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत बिबट्याच्या हल्ल्यात जांबूत आणि पिंपरखेड भागात दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या गस्त घालणाऱ्या वाहनाची मोडतोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंपरखेड आणि जांबूत परिसरात ३५ पिंजरे लावले असून आतापर्यंत त्यात ९ बिबटे जेरबंद झाल्याची माहिती तालुका वनाधिकारी नीळकंठ गव्हाणे यांनी दिली.
पिंपरखेड येथील आंबेवाडी येथे रविवारी पावणेचारच्या सुमारास घडली. बिबट्याने रोहनवर हल्ला करून त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. त्यात तो मृत्यमुखी पडला.
यापूर्वी पिंपरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडेपाच वर्षाच्या बालिकेला प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असातनाच बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा जीव गेल्याने भीती आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आतापर्यत शिरूर तालुक्यातील १२ पेक्षा अधिक नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले आहेत. दरम्यान, पिंपरखेड परिससरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी ३५ पिंजरे लावण्यात आले असून, त्यात ९ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत.
म्हाडाचे सभापती आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या भागातील वाढत्या बिबट्याची संख्या लक्षात घेता केंद्र शासनाने बिबट्या निवारा केंद्र उभे करून बिबट्यांची रवानगी निवारा केंद्रात करावी, अशी मागणी आहे.
बिबट्याच्या वावराने दहशत
दरम्यान, शिरूर शहरातील नदीकाठी अमरधाम, सुशीला पार्क आणि सूरजनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाले होते. त्याच दिवशी बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक नागरिकांना बिबट्या या ठिकाणी दिसत होता. नदीकाठी सूरजनगर, खारे मळा, शनी मंदिर, लाटे आळी, कुंभार आळी, हल्दी मोहल्ला या भागात बिबट्या दिसला आहे.
