पिंपरी : वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. वडिलांच्या डोळ्यासमोरच मुलीचा मृत्यू झाला. हिंजवडी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये अवजड वाहनांबद्दल दहशत निर्माण झाली आहे.
तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. हिंजवडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या चालक अजय अंकुश ढाकणे (वय २२, रा. जांबे) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी याबाबत माहिती दिली. तन्वी ही वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे (वय ४५) यांच्यासोबत दुचाकीवरून पुनावळेकडून हिंजवडीच्या दिशेने चालली होती. वडील दुचाकी चालवत होते. सावंत पार्क चौकातून जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. डंपरच्या धडकेत तन्वी डंपरखाली आली आणि तीचा जागीच मृत्यू झाला तर वडील किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दहा महिन्यात चिमुरडीसह पाच महिलांचा बळी
हिंजवडी परिसरात सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, या बंदी आदेशाचे उल्लंघन करून अवजड वाहने सर्रासपणे प्रवेश करतात. या अवजड वाहनांनी गेल्या दहा महिन्यात पाच महिलांचा बळी घेतला. २४ जानेवारी रोजी हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक उलटला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि त्यात प्रांजली यादव (वय २२) आणि अश्लेषा गावंडे (वय २२) या दोन्ही विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. दुसरी घटना १२ ऑगस्ट रोजी हिंजवडी टप्पा दोन येथे इन्फोसिस कंपनीसमोर सायंकाळी घडली. मिक्सरने धडक दिल्याने प्रत्युषा बोराटे या ११ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या आई-वडीलांसह परिसरातील रहिवाशांनी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. १० ऑक्टोबर रोजी माण रस्त्यावरील पांडवनगर येथे भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील भारती राजेश मिश्रा (वय ३०, रा. थेरगाव) या महिलेचा मृत्यू झाला होता.
