पिंपरी : डासोत्पत्ती ठिकाणे असलेल्या ७३८ आस्थापनांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. तर, ८४ आस्थापनांकडून तीन लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात डेंग्यू आजाराचे २७ संशयित रुग्ण आढळले आहेत.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार या बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : दूषित पाणी थेट पवना नदीत सोडले; लॉन्ड्रीचालकावर गुन्हा

डासोत्पत्ती ठिकाणांची शोधमोहीम तीव्र करून डेंग्यू आजार नियंत्रित करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. वारंवार सूचना देऊनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापना, बांधकाम साईट, गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने आणि घरांची तपासणी करून अशी ठिकाणे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या.

शहरात डोळे येण्याची साथ नाही

डोळे येण्याच्या आजारामध्ये डोळ्यांच्या पापण्या चिकटणे, सतत डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांतून घाण येणे अशी लक्षणे आढळली आहेत. शहरात अद्याप डोळे येण्याची साथ पसरली नाही. वैद्यकीय विभागाने इतर विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली असून हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी केले आहे.

हेही वाचा – “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

शहरात डेंग्यू आजाराचे २७ संशयित रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयांतील रुग्णांची दररोज माहिती संकलित करण्यात येत आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील दोनशे घरांमध्ये पर्यवेक्षण तसेच परिसरात औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये डेंगीच्या तपासणीकरिता आवश्यक रॅपिड किट उपलब्ध करून देण्यात आले. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका