पुणे शहरातील चंदननगर भागातील आंबेडकर वसाहतीमधील 35 वर्षीय साईनाथ जानराव या व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आदित्य वाल्हेकर, समर्थ शर्मा या दोघा आरोपींना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हटल्याने साईनाथ जानराव चा खून करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चंदननगर भागातील डाॅ. आंबेडकर वसाहतीत आरोपी आदित्य वाल्हेकर,समर्थ शर्मा आणि साईनाथ जानराव राहण्यास आहेत. साईनाथ जानराव याने आरोपींच्या नात्यातील महिलेची छेड काढली.या कारणावरुन मंगळवारी १२ ऑगस्ट रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी आदित्य वाल्हेकर, समर्थ शर्मा यांनी साईनाथ जानराव याच्याशी वाद घातला. तू काय म्हणालास, छेड का काढली ? असा जाब विचारला, असे म्हणत साईनाथ जानराव याला लाथाबुक्क्यांनी, हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत साईनाथ जानराव गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.गंभीर जखमी अवस्थेत जानराव याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तर पसार झालेले आरोपी वाल्हेकर आणि शर्मा या दोघा आरोपींना पोलिसांनी काही तासात अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.