पुणे : वैभवशाशी परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी ( ७ सप्टेंबर) होणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे. उत्सवाच्या कालावधीत सात हजार पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटना विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्यभगात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. भाविकांकडील मोबाइल चोरी, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : गणेशोत्सवात जड वाहनांना मध्यभाागात बंदी

उत्सवाच्या कालावधीत पाच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तात राहणार आहे. बंदोबस्तास पोलीस मित्र सहाय करणार आहेत. उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणची बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलीस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत.

हेही वाचा >>> पुण्याच्या खासदारांनी टोचले कान, म्हणाल्या, ‘आवाज कमी करा… ‘

उत्सवी गर्दीवर शहरातील १८०० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहे. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक दर्शनासाठी येतात. परदेशी नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात. मध्यभागात भाविकांकडील दागिने, मोबाइल चोरीच्या घटना घडतात. चोरट्यांना रोखण्यासाठी साध्या वेशातील पथके गस्त घालणार आहे. गुन्हे शाखेकडून सराइतांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

भाविकांसाठी मदत केंद्रे

उत्सवाच्या काळात शहरातील मध्यभागात अठरा पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. उत्सवाची सांगता होईपर्यंत मदत केंद्रांचे कामकाज अहोरात्र सुरू राहणार आहे. या केंद्रात स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत. उत्सवाच्या कालावधीत सहा ठिकाणी शीघ्रकृती दल तैनात करण्यात येणार आहेत. शीघ्र कृती दलातील जवान मनोऱ्यावरून गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत. गर्दीतील गैरप्रकार, तसेच संशयितांवर नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

महिला सुरक्षेला प्राधान्य ; सडक सख्याहरींना चाप

उत्सवाच्या कालावधीत महिलांकडील दागिने, मोबाइल चोरीला घटना घडतात. चोरट्यांना रोखण्यासाठी मध्यभागात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दीत महिलांची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना पकडून त्यांचे छायाचित्र चौकात लावण्यात येणार आहे. सडक सख्याहरींची धिंडही काढण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 thousand police personnel will be deployed during ganesh festival cctv cameras to monitor crowd pune print news rbk 25 zws