बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अडीच हजार रिक्षा चालकांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातील ठिय्या आंदोलन करुन वाहतुकीस अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यासह २३०० ते २५०० रिक्षाचालकांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर सोमवारी विविध रिक्षा संघटनांनी ठिय्या आंदोलन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>भेटवस्तुच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास; कात्रज भागातील घटना

आंदाेलक रिक्षाचालकांनी या भागात दुतर्फा रिक्षा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर सोमवारी रात्री मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आदेशाचा भंग करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been filed against rickshaw pullers for violating the order pune print news amy
First published on: 29-11-2022 at 17:39 IST