लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करताना खरेदीदाराकडून संबंधित मालमत्ता खरेदी करण्यायोग्य आहे किंवा कसे, संबंधित मालमत्तेबाबत काही कायदेशीर वाद तर नाहीत ना? याकरिता शोध अहवाल काढला जातो. आता ई-सर्च रिपोर्ट या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्तांच्या प्रतीमध्ये खरेदी-विक्री आणि साक्षीदाराचे आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे गोपनीय राहणार आहेत. भाडेकरार किंवा खरेदी-विक्री दस्तांवरील नागरिकांची माहिती गोपनीय ठेवण्यास नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने प्राधान्य दिले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाकडून राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) मदतीने संगणकप्रणाली तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता ई-सर्च मधून जुलै २०२३ पूर्वीचे दस्त डाऊनलोड केल्यानंतर त्या दस्तांवर सूची दोन (इंडेक्स-टू), पक्षकारांची छायाचित्रे आणि स्वाक्षरी एवढीच दिसणार आहे. अंगठ्याचे ठसे या ठिकाणी फक्त ‘बरोबर’ अशी खूण दिसणार आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरून भाडेकरार किंवा सदनिका, दुकाने, जमीन आदी खरेदी-विक्री व्यवहारांचे दस्त डाऊनलोड करता येतात. दस्तांच्या प्रती डाऊनलोड करण्यासाठी नोंदणी विभाग शुल्क आकारते. ई-सर्चमधून हे दस्त उपलब्ध होतात.

आणखी वाचा-पुणे : डेक्कन कॉलेजच्या आवारात वणवा

यापूर्वी ई-सर्चमधून उपलब्ध होणाऱ्या दस्तांच्या प्रतींमध्ये आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे दिसत होते. यातून गैरप्रकार होऊ नये, यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पक्षकारांच्या अंगठ्‌याचे ठसे सुरक्षित करण्याच्या सूचना नोंदणी व मुद्रांक विभागाला दिल्या होत्या. ई-सर्चवर मुंबई शहरातील सन १९८५ पासूनचे दस्त उपलब्ध आहेत, तर उर्वरित राज्यात सन १९९८ पासूनचे दस्त ई-सर्चवर उपलब्ध आहेत. त्यामुळे या काळातील दस्त ई-सर्चवरून डाऊनलोड केल्यानंतर त्या दस्तांवरील आधार क्रमांक आणि अंगठयाचे ठसे गोपनीय राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar and thumb impression will disappear while searching for property online pune print news psg 17 mrj
First published on: 17-02-2024 at 20:36 IST