पिंपरी : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे लीडरशिप फॉर इक्विटी आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.

सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खापरिया, लीडरशिप फॉर इक्विटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर रेड्डी बानुरी, मुख्य कार्यपालन अधिकारी दामिनी माईणकर, रोबोटेक्स इंडियाच्या कार्यपालन प्रमुख मनीषा सावंत यावेळी उपस्थित होते.

‘विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जगाचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांची कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी रोबोटिक्स प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे. ही प्रयोगशाळा केवळ तंत्रज्ञान शिकवणारी नसून, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारी, समस्या सोडवणारी आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण मिळून नवकल्पना विकसित करणे शक्य होईल. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे अचूकता, गती आणि विश्वासार्हता वाढली आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तंत्रज्ञानासोबत जगायला शिकले पाहिजे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

दामिनी माईणकर म्हणाल्या, ‘रोबोटिक्स प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रयोगशाळेच्या मदतीने विद्यार्थी रोबोटिक्स आणि प्रोग्रॅमिंग अधिक सखोलपणे शिकून नवकल्पनांना मूर्त रूप देऊ शकतील. दृष्टिकोन अधिक व्यापक करू शकतील.‘

‘या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध रोबोटिक्स स्पर्धांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योजकता आव्हान, लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर आणि गर्ल्स फायर फाईट यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता वाढेल तसेच संघभावना, नेतृत्वगुण आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यही विकसित होईल’, असे मनीषा सावंत यांनी नमूद केले.

‘या उपक्रमाचे सातत्य टिकवण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडक शाळांतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.’ असे डॉ. श्रद्धा खापरिया यांनी सांगितले.