पुणे : म्हणालात तर प्रश्न सामान्य वाटावा असा, पण खरं तर तेवढाच महत्त्वाचा. सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आता पुण्यात परगावातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. ती विसर्जन मिरवणुकीपर्यंत वाढतच जाणार आहे. एवढ्या सगळ्या नागरिकांना गणेशोत्सवातील देखावे बघण्याचा आनंद मिळावा, यासाठी समस्त गणेश मंडळांनी कित्येक दिवसांपासून तयारी केली. आता डोळ्यांचे पारणे फिटायचे फक्त बाकी. एवढ्या सगळ्या परगावातील पाहुण्यांसाठी पुणे शहराने काय तयारी केली आहे? या प्रश्नाचे उत्तर काहीही नाही, एवढेच असू शकते. एकेकाळी फक्त मध्य पुण्यातील पेठांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दाटलेला असे. गेल्या काही वर्षांत तो उपनगरांमध्येही पोहोचला आहे आणि तेथेही तो ओसंडून वाहतो आहे.

पण या गणेश दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी शहरात किती स्वच्छतागृहे आहेत, त्यातील किती स्वच्छ आहेत, त्यातही महिलांसाठीची स्वच्छतागृहे नावाला तरी आहेत काय, याचे उत्तर देण्याची ना कारभाऱ्यांना गरज, ना महापालिकेतील प्रशासनाला. गेली कित्येक वर्षे हा प्रश्न पुणेकरांनाही भेडसावतो आहें. पण त्यावर उत्तर शोधायचे कष्ट कुणीही घेतले नाहीत. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या या शहरात रस्त्यांवर कुठेही स्वच्छतागृहे नसावीत, हे किती निर्लज्जपणाचे आहे, याची चाड कुणालाही नसावी, हे या शहराचे दुर्दैव. शहरातील सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर कुठेही अगदीच एखादा अपवाद वगळता, स्वच्छतागृहे नाहीत. जी काही बोटावर मोहता येण्याएवढी आहेत, ती इतकी गलिच्छ अवस्थेत आहेत, की तेथे जाण्याची किळस वाटावी.

हे ही वाचा…पुणे : जिल्हा मध्यवर्ती बंँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना जन्मठेप

एवढ्या मोठ्या शहरात इतकी प्राथमिक सुविधाही उपलब्ध नसावी, याबद्दल पुणेकर म्हणून आपल्याला लाज वाटायला हवी. गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या पाहुण्यांची इतकी साधी नैसर्गिक गरजही आपण पुरवू शकत नसू, तर मग हजारो कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचे करायचे तरी काय? लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता अशा गर्दीच्या रस्त्यांवर औषधालाही स्वच्छतागृह असू नये, याकडे कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुणाही नगरसेवकाचे इतक्या वर्षांत लक्षही जाऊ नये, याचा अर्थ त्यांना पुणेकरांचे प्रश्नच समजले नाहीत, असा होतो. शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत तासन् तास अडकून राहणाऱ्या महिला-पुरुषांचे जे काय हाल होतात, त्याची कल्पना या कारभाऱ्यांना कशी येत नाही? इतके असंवेदनशील राहून टेचात निवडणूक लढवण्यासाठी कोट्याने खर्च करू शकणाऱ्या राजकीय नेत्यांना कुणी जाब विचारायचेही धाडस करू नये, ही शोकांतिकाच.

रस्ते सिमेंटचे झाले, पण त्यावर कुठेही आवश्यक सुविधा उभ्या करण्यात आल्या नाहीत. स्मार्ट सिटी योजनेत मिळालेले शेकडो कोटी रुपये, केवळ दिखाऊपणावर खर्च झाले. तो दिखाऊपणाही कुचकामीच राहिला आणि मूळ प्रश्नही दुर्लक्षितच राहिले. दिवसभर घराबाहेर असणाऱ्या पुणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण त्यांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थेला कमालीचे अपयश आले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याचे कामही धड करता न येणारी महापालिकेने टेंभा तरी कशाचा मिरवायचा? कुणालाही आपल्या फ़रात ही व्यवस्था नको असते. याचे खरे कारण त्याकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष. अंधाऱ्या जागेत, पाणी नसलेल्या परिस्थितीत असलेल्या अशा स्वच्छतागृहांकडे लक्ष देणारी साधी यंत्रणा असू नये? पालिकेला कोणतेच काम धड़ जीत नाही, हे तर हजारवेळा सिद्ध झाले आहे. रस्ते बांधणीपासून ते कचरा संकलनापर्यंत सगळी कामे बाहेरून करून घेण्याचे धोरण आता पुणेकरांच्या मुळावर आले आहे. गणेशोत्सवातील मांगल्य अशा बिनडोकपणामुळे लयाला जाते, हेही न समजणाऱ्यांनाच आपण सगळेजण पुन्हा पुन्हा निवडून देतो. ते निवडून आल्यावर आपल्याला वाटाण्याच्या अक्षता लावतात, तरी आपण निर्बुद्धपणे त्यांच्याच समोर हतबल होऊन उभे राहतो.

हे ही वाचा…लोकजागर: गावे गाळा, गावे वगळा!

हे चित्र बदलायचे असेल, तर या शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर हे शहर निवासासाठी लायक राहणार नाही. वाहतूक कोंडी, प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, अपुरे पाणी, मैलापाण्याच्या निचऱ्याची अपुरी व्यवस्था अशा एका भयावह चक्रात हे शहर सापडले आहे आणि त्याला कुणीही त्राता नाही.. mukundsangoram@gmail.com