इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विरोधात पिंपरी- चिंचवड शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज इंद्रायणी नदीकाठी इंद्रायणी बचाव एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासह विविध पर्यावरण प्रेमी संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने भाजप हटाव, इंद्रायणी बचाव च्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. ‘सत्ताधारी भाजप व महायुती सरकारच्या निष्क्रिय भ्रष्ट कारभारामुळे पवित्र इंद्रायणी नदी आज प्रचंड प्रदूषित झाली असून मरणासन्न अवस्थेत आहे. नमामी इंद्रायणी च्या नावाखाली जनतेची दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आजवर पवित्र इंद्रायणीच्या नावाखाली केवळ भ्रष्ट कारभार केला आहे. पण यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही अशी भावना उपस्थित आंदोलक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पाच दिवस मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज

यावेळी सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत इंद्रायणी नदीला पुनरुज्जीवीत करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काळात जनआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा सर्वच महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेविका सुलभा उबाळे, सुलक्षण शिलवंत धर, गणेश भोंडवे, विनायक रणसुभे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, तुषार सहाणे, कुणाल तापकीर, विशाल चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, पिंपरी- चिंचवड शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे, वंदनाताई आराख यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Against indrayani river pollution indrayani rescue elgar movement on behalf of pimpri chinchwad city mahavikas aghadi today along indrayani river kjp 91 amy