उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही पुण्याच्या मावळमध्ये पोहोचली. तळेगाव या ठिकाणी अजित पवार यांची भव्य सभा झाली. सभेदरम्यान राष्ट्रवादीच्या तरुणाने ‘अजित दादा’ पुन्हा राष्ट्रवादी पक्षात या अशी विनवणी थेट अजित पवार यांचे भाषण सुरू असताना केली. यामुळे सर्वांचं लक्ष त्या राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याकडे वेधलं गेलं होतं.

हेही वाचा – अजित पवारांसमोर सुनील शेळकेंच्या डोळ्यात आलं पाणी! सुनील तटकरे यांनी दिली पाठीवर थाप, नेमकं काय झालं?

हेही वाचा – गरवारे मेट्रो स्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणांची लूट

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अनेक कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शरद पवार की अजित पवार अशी त्यांची अवस्था झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते आजही योग्य तो निर्णय घेऊ शकलेले नाहीत. मावळच्या तळेगावमध्ये जनसन्मान यात्रेच्या दरम्यान अजित पवार यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याने ‘अजित दादा’ पुन्हा आपल्या पक्षात या, अशी मोठ्याने हाक दिली. विक्रम बोडके असं या तरुणाचं नाव असून अजित पवारांनी थांब तुला थोड्या वेळाने बोलतो, असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरुण थांबत नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या तरुणाच्या हातातील अजित दादा राष्ट्रवादीत पक्षात पुन्हा या असा उल्लेख असलेलं फ्लेक्स काढून घेतला. महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्याच्या विकास हा अजित पवार आणि शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे त्या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा या तरुणांनी व्यक्त केली आहे.