पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून वाभाडे काढले होते. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर आता पुन्हा चौकशीसाठी उपसमिती नेमण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ओल्या पार्टीची चौकशी लांबत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ससूनमध्ये काही निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पिऊन गोंधळ घातला होता. त्यात अस्थिव्यंगोपचार विभागातील तीन निवासी डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी मद्य पिऊन शेजारील निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. या प्रकरणी एका निवासी महिला डॉक्टरने तक्रार केली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने १ जानेवारीला नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली. या समितीने मागील आठवड्यात चौकशी करून अहवाल अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमोर सादर केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ससूनमधील ३१ डिसेंबरच्या घटनेप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्याबाबत काही प्रश्न उपस्थित झाले. आता या प्रकरणी उपसमिती नेमण्यात आली असून, ती आधीचा चौकशी अहवाल तपासून कारवाई करण्याबाबत अहवाल सादर करेल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
-डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

हेही वाचा : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांची अटक अटळ?

या अहवालावर बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर शिक्षण समितीसमोर चर्चा झाली. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष अधिष्ठाता असतात. या समितीने घटनेच्या वेळचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर संबंधित निवासी डॉक्टरांचीही समितीने चौकशी केली. मात्र, दोषींवर नेमकी काय कारवाई करावयाची याबाबत समितीचे एकमत झाले नाही. याचबरोबर चौकशी अहवालाबाबतही प्रश्न उपस्थित कऱण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. आता ही उपसमिती आधीच्या चौकशी अहवालाची तपासणी करून कारवाईबाबत शिफारस करणार आहे. त्यावर अधिष्ठाता कारवाईचा अंतिम निर्णय घेतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.