भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असे विधान केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. आज पुण्यातील कोथरूड येथील चंद्रकांत पाटलांच्या ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी जात असताना. पिंपरी चिंचवड येथे काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. त्यानंतर चिंचवडमधील भाजपचे पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तर या घटनेचा भाजपकडून निषेध नोंदविण्यात येत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुण्यात एका लग्न समारंभासाठी आले असता. त्यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक झाल्याच्या घटने बाबत विचारले. यावेळी ते म्हणाले, “असले प्रकार कोणीही करता कामा नये. राजकीय किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तीने काहीही बोललं असेल तर कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार दिला नाही. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे. मी त्याचा निषेध व्यक्त करतो. चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चुकीच असून त्याच समर्थन कोणीही करीत नाही. त्यावर आम्ही भूमिका मांडली आहे. कायदा कोणीही हातामध्ये घेऊ नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करणं अतिशय अयोग्य असून मी त्याचाही निषेध व्यक्त करतो.