पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान यावर्षी अर्जुन घुंडरे, विवेक घुंडरे यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास राजा-प्रधान, आमदार- मल्हार तसेच सावकार-संग्राम आणि माउली- शंभू या चार बैलजोड्यांची आळंदीतील श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणामार्गे सोमवारी मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी बैलजोडींचे स्वागत केले.
मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने बैलजोडीची पूजा करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, नीलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, पंढरपूर देवस्थानच्या विश्वस्त ॲड. माधवी निगडे, बैल समितीचे प्रमुख बबनराव कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर यावेळी उपस्थित होते.
पालखी सोहळा अवघ्या १५ दिवसांवर आला आहे. देवस्थानकडून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान यावर्षी घुंडरे यांना मिळाला आहे. त्यांनी पालखीसाठी भारदस्त बैलजोडी खरेदी केली आहे. पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवली आहे. बैलजोडीची आळंदीत वाजत गाजत, हरिनाम जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरू झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये मुकुंद गांधी परिवारातर्फे स्वागत पूजा करण्यात आली.