पिंपरी- चिंचवड: मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा तीनने बेड्या ठोकल्या आहेत. २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी चऱ्होली परिसरातील प्राइड वर्ल्ड सिटी या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आठ नागरिकांना चाकूचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विश्वजीत अर्जुन पवार आणि यव्हान भास्कर कासार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ आणि २२ फेब्रुवारी रोजी आळंदी, पुणे शहरात आणि ग्रामीण भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्याची घटना घडली होती. दोन दिवसांमध्ये एकूण १४ घटना घडल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्यात सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट तीनचे अधिकारी आणि खंडणी विरोधी पथक त्याचबरोबर आळंदी आणि दिघी पोलीस ठाणे हे समांतर तपास करत होते. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी यव्हान भास्कर कासार आणि विश्वजीत अर्जुन पवार यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले. दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पैकी विश्वजीत अर्जुन पवार जालना जिल्ह्यात चार गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहे. त्याच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी यव्हान कासार याच्यावर देखील पूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alandi the police arrested the accused who looted the morning walkers kjp 91 ssb