पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे ऑगस्टच्या मध्यातच पूर्ण क्षमतेने भरली

शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची पुढील वर्षभराची चिंता मिटली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे ऑगस्टच्या मध्यातच पूर्ण क्षमतेने भरली
(संग्रहीत छायाचित्र)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे यंदा ऑगस्टच्या मध्यालाच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या पाच वर्षांत सन २०१९ चा अपवाद वगळता एवढ्या लवकर चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. यंदा चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे.

सध्या चारही धरणांत मिळून २९.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली होती. तसेच पूर्वमोसमी पावसाने यंदा हजेरी लावली नाही. याशिवाय मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरूवातीला चारही धरणांमधील पाणीसाठा २.५५ टीएमसी म्हणजेच के‌वळ ८.७५ टक्के शिल्लक राहीला होता. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या परिसरात ४ जुलैपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर केवळ सहा दिवसांत म्हणजेच ११ जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हंगामात प्रथमच धरण भरल्यापासून मुठा नदीत गेल्या सहा वर्षातील लवकर सुरू करण्यात आलेला विसर्ग ठरला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वरसगाव आणि पानशेत ही महत्त्वाची धरणे भरली, तर टेमघर धरणात ९७ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती –

दरम्यान, गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. सन २०२० मध्ये १३ ऑगस्टला खडकवासला, तर १८ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट रोजी अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव ही दोन्ही धरणे भरली. मात्र, १ नोव्हेंबर रोजी टेमघर धरण १०० टक्के भरले. सन २०१९ रोजी पूर्वमोसमीसह मोसमी पाऊस सक्रीय झाल्यापासून मुसळधार पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडला होता. त्यामुळे या वर्षी ६ ऑगस्ट रोजीच चारही धरणे १०० टक्के भरली होती. सन २०१८ रोजी १६ जुलै रोजी खडकवासला, ३१ जुलै रोजी पानशेत, तर १९ ऑगस्ट रोजी वरसगाव धरणे पूर्ण क्षमतेने भरले. टेमघर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने या वर्षी हे धरण केवळ २.४५ टीएमसी म्हणजे ६५.९७ टक्के एवढेच भरले होते. सन २०१७ मध्ये २४ जुलै रोजी खडकवासला, ३ ऑगस्ट रोजी पानशेत, तर १ सप्टेंबरला वरसगाव धरण १०० टक्के भरले. या वर्षी देखील गळतीमुळे टेमघर धरण केवळ २.६ टीएमसी म्हणजे ५५.६५ टक्के ए‌वढेच भरू शकले होते, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : विधिमंडळ अधिवेशनानंतर सहा नगररचना योजनांची ‘पीएमआरडीए’कडून अधिसूचना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी