पुणे : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात ; दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी

विभागीय आयुक्तालय असलेल्या विधान भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पुणे : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात ; दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात सजावट करण्यात आली होती.

राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेताविणाऱ्या गीतांची मालिका… रांगोळीच्या आकर्षक पायघड्या… तिरंगी फुगे, झिरमिळ्यांची सजावट… ध्वजारोहण होत असताना ध्वजावर होणारी पुष्पवृष्टी… अशा अमाप उत्साहात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोमवारी साजरा करण्यात आला. करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी लाभल्याने सर्वत्र झेंडावंदन कार्यक्रम पारंपरिक जल्लोषात झाले.

विभागीय आयुक्तालय असलेल्या विधान भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ‘मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कालखंडात भ्रष्टाचार झाल्याचे ऐकिवात नाही. कोणावर डागही लागलेला नाही. यावरून मोदी हे भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी मेहनत घेत आहेत, हे ध्यानात येते,’ असे कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात सजावट करण्यात आली होती. शालेय मुलामुलींनी परिधान केलेले तिरंगी टी-शर्ट, तिरंगी फुगे आणि झिरमळ्यांची तोरणे यामुळे सर्वत्र तिरंग्याने भारलेले वातावरण अनुभवावयास मिळाले. प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या तिरंगी तोरणाने शनिवारवाड्याच्या सौंदर्यात भर पडली होती.

‘हर घर तिरंगा’ या केंद्र सरकारच्या अभियानाला प्रतिसाद देत पुणेकरांनी शनिवारपासून घरावर तिरंगा फडकवला आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी दुकानांवर तिरंगा फडकवला. तर, रिक्षाचालक आणि दुचाकीचालकांसह मोटारमालकांनी आपल्या वाहनावर तिरंगा फडकवला आहे. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि संघटनांनी काढलेल्या दुचाकी तिरंगा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन, श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थी असा त्रिवेणी योग जुळून आल्याने राष्ट्रभक्ती आणि देवभक्तीचा मिलाफ घडून आला. कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग येथील तळ्यातील गणपती या मंदिरांसह ओंकारेश्वर, पाताळेश्वर, सोमेश्वर, मृत्युंजयेश्वर या मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amritmahotsav independence day in excitement a chance to hoist the community flag after two years pune print news amy

Next Story
पिंपरी-चिंचवडला दोन महिन्यात १०० टक्के कचरा विलगीकरण ; ‘उद्योगनगरीची ओळख यापुढे क्रीडानगरी’
फोटो गॅलरी