पिंपरी: चिंचवड मध्ये पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह इतर चार जणांना मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशातून आणलेली पिस्तूल सराईत गुन्हेगार नवल झामरे हा पिंपरी- चिंचवड मध्ये आणून विकत असल्याचे निष्पन्न झाल आहे. पिंपरी- चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने ७ पिस्तूल, १४ जिवंत काडतुसासह १६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे, सुरज अशोक शिवले, नवल वीरसिंग झामरे, कमलेश उर्फ डॅनी कानडे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे ही वाचा…कारागृहातून बाहेर पडताच वाहन चोरीचे गुन्हे; दोन मोटारी, पाच दुचाकी जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप ढगे, सुरज शिवले आणि नवल वीरसिंग झामरे या तिघांना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मालमत्ता विरोधी पथकाने ताब्यात घेतलं. याबाबत ची माहिती पोलीस कर्मचारी गणेश सावंत, हर्षद आणि सुमित देवकर यांना मिळाली होती. आरोपींकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे तीन पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे मिळाली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांवर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर करून त्यांना पोलीस कोठडी घेण्यात आली. यादरम्यान, चौकशीत आरोपी झामरे हा मध्य प्रदेश मधून पिस्तुल आणून इतर आरोपींना विकत असल्याचे समोर आलं. झामरेने कमलेश कानडे मार्फत पवन शेजवळ याला देखील एक पिस्तुल आणि जिवंत काडतुस विकल्याच समोर आलं. तसेच झामरेकडे आणखी तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे मिळाली.

हे ही वाचा…पिंपरी-चिंचवड: वाहन तोडफोडे सत्र सुरूच; १३ ते १४ वाहनांची कोयत्याने तोडफोड

एकूण कारवाई मध्ये ७ पिस्तूल १४ जिवंत काडतुसांसह १६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी झामरे हा पिस्तुलांची तस्करी करत असल्याच तपासात निष्पन्न झाल आहे. पैकी, पवन शेजवळ याच्यावर घरपोडीचे पाच गुन्हे दाखल असून कमलेश उर्फ डॅनी कानडे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची टीम पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, गणेश सावंत, हर्षद कदम, सुमित देवकर, नितीन लोखंडे,आशिष बनकर, गणेश हिंगे यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti property squad arrested one man along with four others who smuggled pistols in pimpri chinchwad pune print news kjp 91 sud 02