पुणे : ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानी कारभाराविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोबाइल ॲपवरून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व कॅबचालकांनी गुरुवारी राज्यभरात संप पुकारला. याचा फटका पुणे विमानतळ, रेल्वे स्थानक, एसटीच्या प्रवाशांना बसला. ‘पीएमपी’ला त्यामुळे गर्दी झाली.

ओला, उबर आणि रॅपिडो या ॲग्रिगेटर कंपन्यांविरोधात रिक्षा, कॅबचालकांचे आणि विविध संघटनांचे आझाद मैदानात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. परिवहन विभागाच्या निर्देशांचे पालन या कंपन्यांकडून होत नसताना त्यांवर कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला असून, त्याविरोधात हा एक दिवस संप पुकारण्यात आला.

संपाचा परिणाम पुणे रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस स्थानकांच्या ठिकाणी दिसला. जे रिक्षा, कॅबचालक प्रवाशांना सेवा देत होते, त्यांना काही ठिकाणी अडविण्यात आले. विमानतळ परिसरातील ‘एरोमाॅल’ येथे शुकशुकाट होता. या ठिकाणी प्रवासी वाहनांच्या प्रतीक्षेत उभे होते.

परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा बस सोडल्या होत्या. स्वारगेट, शिवाजीनगर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकाबोहरही खासगी रिक्षाचालक आणि पीएमपीची सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

एरोमाॅल येथील ॲग्रिगेटर कंपन्यांच्या चालकांनी संप पुकारल्यामुळे जादा बस सोडण्यासाठी पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानुसार पीएमपी प्रशानाने जादा बस सोडल्याने विमानतळ प्रवाशांना दिलासा मिळाला. पीएमपीचे सहकार्य लाभले. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ.