सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार रोहित पवार, माधुरी मिसाळ यांची नियुक्ती राज्य विधान मंडळाकडून करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा पवार घराण्यातील प्रतिनिधी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम करणार आहे.
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी असतो. त्यानुसार २०२२मध्ये अधिकार मंडळांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर नुकतीच अधिसभा, अभ्यास मंडळांसाठीची निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणुकीसह राज्यपालांकडून आणि विधान मंडळाकडून सदस्यांची अधिसभेवर नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार राज्यपालांकडून काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. आता विधान मंडळाकडून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम केले होते. आता रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याने सलग दुसऱ्यांदा विद्यापीठ अधिकार मंडळावर पवार घराण्यातील प्रतिनिधी काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.