पुणे : खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात घडली.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात राहायला आहेत. त्या कुटुंबीयांसह शनिवारी (३१ मे) दुपारी लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. बेलबाग चौकातील एका वस्त्रदालनातून त्यांनी खरेदी केली. त्यानंतर त्या बेलबाग चौकातून हुतात्मा बाबू गेनू चौकाकडे निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून तीन लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी चोरी
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील दीड लाखांची सोन्याची बांगडी चोरल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. त्या स्वारगेट परिसरातील पीएमपी स्थानकात बसमध्ये प्रवेश करत होत्या. गर्दीत चोरट्याने कटरचा वापर करून महिलेच्या हातातील बांगडी कापली. दीड लाखांची बांगडी चोरून चोरटा पसार झाला. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.