लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वैमनस्यातून गुंड नयन मोहोळ आणि साथीदारांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम परिसरात घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दोघांना अटक केली.

संतोष भरेकर (वय ३७, रा. कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋतिक संजय मोहोळ, ओम प्रताप पवार (दोघे रा. हमालनगर, मार्केट यार्ड) यांना अटक करण्यात आली आहे. गुंड नयन भाऊसाहेब मोहोळ (रा. हमालनगर) आणि साथीदार निखिल बाबर यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरेकर आणि गुंड मोहोळ यांच्यात वाद आहेत. मोहोळ आणि साथीदारांनी २०१३ मध्ये भरेकर याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. भरेकर गंगाधाम फेज दोन परिसरातून निघाला होता. त्यावेळी मोहोळ आणि साथीदारांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत भरेकर गंभीर जखमी झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.

आणखी वाचा-कोंढवा परिसरात दोन किलो गांजा जप्त; गांजा विक्री प्रकरणात सराईत अटकेत

गुंड नयन मोहोळ याची मार्केट यार्ड भागात दहशत आहे. मोहोळे आणि साथीदार निखिल बाबर यांनी २०१८ मध्ये शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत दहशत माजवून एका तरुणावर गोळीबार केला होता. याप्रकरणात मोहोळ, बाबर आणि साथीदारांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवून मोहोळ आणि बाबर कारागृहातून बाहेर पडले होते.