पाळीव कबुतरांच्या त्रासामुळे पोलिसांकडे तक्रार केल्याने एकावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपेश चव्हाण (वय ४३, रा. घोरपडी गाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि चव्हाण शेजारी आहेत. आरोपींची कबुतरांची ढाबळ आहे. कबुतरांच्या विष्ठेचा त्रास होतो, अशी तक्रार चव्हाण यांनी मुंढवा पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यानंतर आरोपींनी पाळीव कबुतरे सोडून दिली होती. त्यामुळे आरोपी चव्हाण यांच्यावर चिडून होते.
चव्हाण घोरपडी गाव परिसरातून जात होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना गाठले आणि कोयत्याने वार केले. चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांनी सांगितले.