पिंपरी- चिंचवड : पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर भीषण अपघात होऊन ऑडी कार जळून खाक झाली आहे. ही घटना आज पहाटे साडेचार च्या सुमारास घडली. ओडी कारमधील आयुष्य फाळके हा प्रवाशी किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने त्याच्यासह तीन जण नशीब बलवत्तर असल्याने बचावले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, एम.एच- १४ एल.पी- ९९९ क्रमांकाची ओडी कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. खराडी जवळ येताच ऑडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर टेम्पो ला पाठीमागून जोरात धडक दिली. ओडीमधील सर्व प्रवाशी खाली उतरले, पैकी आयुष किरकोळ जखमी झाला.

अपघातात ऑडीला आग लागली. हळूहळू अख्ख्या ऑडीला आगीने वेढले. तातडीने पिंपरी- चिंचवड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परंतु, आग इतकी भीषण होती, की ऑडी कार जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. तोपर्यंत ऑडी जळून खाक झाली होती. काही वेळ पुण्याहून मुंबई च्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवून वाहन बाजूला करण्यात आलं आहे. वाहतूक सुरळीत झाली आहे.