पुणे : ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेले एक कुटुंब त्यांच्या मूळगावी लोणावळ्यात दिवाळी साजरी करण्यासाठी आले. मात्र, या कुटुंबातील महिलेची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या अवयवदानातून चौघांना जीवदान मिळाले असून ती पुण्यातील पहिली परदेशी अवयवदाता ठरली आहे.
गेल्या काही वर्षांपासून लोण्यावळ्यातील एक कुटुंब ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहत होते. त्यांनी तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी हे कुटुंब लोणावळ्यात आले होते. या कटुंबातील ४६ वर्षीय महिलेला अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिला उपचारासाठी चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान महिलेला मेंदूमृत घोषित करण्यात आले. या धक्क्यातून सावरत या महिलेच्या पतीने आणि भावाने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ही महिला ऑस्ट्रेलियाची नागरिक असल्याने अवयवदानासाठी ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाची परवानगी आवश्यक होती.
ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाकडून परवानगी मिळाल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने अवयव वाटपाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचे वाटप केले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका रुग्णाला एक मूत्रपिंड आणि दुसऱ्या रुग्णाला यकृत देण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णाला एक मूत्रपिंड देण्यात आले.
मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमधील रुग्णाला हृदय देण्यात आले. या चारही रुग्णांवर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
परवानगी मिळविण्याचे आव्हान
आदित्य बिर्ला हॉस्पिटलने तातडीने ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाला ई-मेल पाठवून अवयवदानाची परवानगी मागितली. मात्र, २ नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यामुळे सुटीचा दिवस असल्याने तातडीने परवानगी मिळणे अवघड होते. दूतावासाकडून परवानगीस विलंब झाल्यास अवयवदान करणे शक्य नव्हते. रुग्णालय प्रशासन, प्रत्यारोपण पथकातील सदस्या डॉ. उर्वी शुक्ला, प्रत्यारोपण समन्वयक वैशाली पवार, महिलेचे पती आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या डॉ. शीतल महाजनी, डॉ. वृषाली पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या अवयवदानास ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाची परवानगी वेळेत मिळू शकली.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर, प्रत्यारोपण समन्वयक आणि संपूर्ण प्रक्रियेत मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. दूतावासाशी संपर्क साधण्यापासून ते संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली. ही घटना आरोग्यसेवेचा खरा अर्थ दाखवते — म्हणजेच, ‘करुणा कृतीतून दिसते’ आणि एकत्र प्रयत्न केल्यास समाजात बदल घडवता येतो. – पामेश गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल.
