पुणे : भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात ‘विवेकानंद केंद्र’ आणि ‘कन्याकुमारी मराठी प्रकाशना’च्या वतीने ‘मार्क्स आणि विवेकानंद : एक तौलनिक अध्ययन’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अविनाश धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालकाकडून धर्माधिकारी यांचा ‘पाहुणे’ म्हणून उल्लेख करण्यात येत होता. त्यावर निषेध व्यक्त करत धर्माधिकारी यांनी विवेकानंदांच्या विचारांशी असलेले नाते उलगडले. ‘मी विवेकानंदांच्या विचारातून घडलो असून, ज्ञान प्रबोधिनीच्याच शाळेत शिकलो आहे. त्यामुळे मी ‘पाहुणा’ नाही,’ असे धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले,‘माझा सगळा जीवच स्वामी विवेकानंदाच्या विचारांवर पोसला गेला आहे. त्यांच्या विचारांमुळेच माझी वैचारिक जडणघडण झाली. शालेय वयातच स्वामी विवेकानंदांनी लिहलेले पुस्तक हाती पडले, आणि तिथून पुढे विवेकानंदांचे प्रत्येक पुस्तक वाचायचे असे ठरवले.’
ज्ञान प्रबोधनीच्या शाळेत शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंदांनी लिहलेली पुस्तके ग्रंथालयातून मिळवून वाचायचो, अशी आठवण धर्माधिकारी यांनी सांगितली. ‘ विवेकानंदाचे विचार वाचणाऱ्या कुणावरही प्रभाव पाडतात. त्यातून वैचारीक पिंड घडला जातो. त्यामुळे प्रबोधच्या ग्रंथालयातून मिळवलेल्या, वाचत असलेल्या पुस्तकांमध्ये अनेक ठिकाणी रेषा मारलेल्या दिसतील.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रभावातून त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास करताना ही सवय लागली. त्यामुळे अजुनही प्रबोधनीच्या ग्रंथालयातील त्या पुस्तकांमध्ये रेषा मारलेल्या दिसल्या, तर तो गुन्हेगार मीच असण्याची शक्यता आहे,’ अशी प्रेमळ कबुली धर्माधिकारी यांनी बोलताना दिली.
‘भारतमातेचा पुत्र, ज्ञान साधनेचे व्रत आणि विवेकानंदांचा विद्यार्थी…’
‘विवेकानंद ग्राम’ला मी होम अवे फ्रॉम होम असेच संबोधतो. आजही कुणी ओळख विचारल्यावर ‘भारतमातेचा पुत्र, ज्ञान साधनेचे व्रत आणि विवेकानंदांचा विद्यार्थी,’ अशीच ओळख सांगतो. विवेकानंदांचा शिष्य होण्याइतकी पात्रता माझ्यामध्ये आहे की नाही, याबाबत खात्री वाटत नाही. मात्र, विवेकानंदांचा विद्यार्थी म्हणवून घेताना कोणतीही शंका वाटत नाही, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले.