पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात पसार झालेले आरोपी शिवम आंदेकर, त्याचा भाऊ अभिषेक, शिवराज आणि आई लक्ष्मी हे पसार झाले. पुण्यातून पसार होताना त्यांनी स्वत:च्या वाहनाचा वापर केला नाही. पसार झालेल्या आरोपींनी सुरत, उज्जेैन, उदयपूर, द्वारका येथे प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींना सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणी शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नाना पेठ) यांना गुजरात सीमेवरुन शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (वय ७०,), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), विवाहित मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०), अमन युसुफ पठाण (वय २५), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगु (वय २०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) हा पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
आयुष कोमकर लहान भावाला शिकवणीहून घेऊन ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबत आयुषची आई कल्याणी (वय ३७) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होते. आंदेकरचा पुतण्या शिवम, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर हे गुजरातला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून शनिवारी सायंकाळी अटक केली.
कोमकर खून प्रकरणानंतर आरोपी शिवम, त्याचा भाऊ अभिषेक, शिवराज, आई लक्ष्मी आंदेकर हे खासगी प्रवासी (ट्रॅव्हल) बसने ते पुण्यातून बाहेर पडले. सूरतहून ते बसने उज्जैन येथे गेले. उज्जैनमध्ये महाकाल दर्शन घेतल्यानंतर आंदेकर राजस्थानातील उदयपूर येथे गेले. उदयपूर येथे पर्यटन केले. तेथून ते गुजरातकडे निघाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाला आंदेकर सुरतमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. राजस्थानातून गुजरातमधील द्वारकेकडे ते निघाले होते. पोलिसानी चैाघांना सापळा लावून पकडले. आरोपींनी मोबाइल संच बरोबर ठेवले नव्हते. पुण्यात संपर्क साधण्यासाठी ते बसमधील प्रवाशांकडे विनंती करून त्यांच्य़ा मोबाइलचा वापर करायचे, अशी माहिती सूत्रांनी दिली.