Vanraj Andekar Murder Case update: पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत बेछूट गोळीबार करून खून करण्यात आला. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळीबार; तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून केला. आयुष याच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.