पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याच्यावर आंदेकर टोळीतील सराइतांनी ११ गोळ्या झाडल्याचे उघडकीस आले. त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात शिरल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन आलेल्या आयुषवर नाना पेठेतील लक्ष्मी काॅम्प्लेक्समधील तळमजल्यावर दबा धरून बसलेल्या आंदेकर टोळीतील सराइत यश पाटील आणि अमन पठाण यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी यश सिद्धेश्वर पाटील (वय १९) आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९, रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली. याबाबत आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पसार आरोपी यश पाटील, अमित पाटोळे यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. ‘या प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आयुषवर गोळीबार झाला, त्या वेळी अमित पाटोळे, सुजल मिरगू तेथे होते. आरोपींना पिस्तूल कोणी दिले, या दृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी,’ अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने पाटील आणि पाटोळे यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जर्किनची चाळण
आयुषवर आरोपींनी अकरा गोळ्या झाडल्या. हल्ला झाला तेव्हा आयुषने जर्कीन परिधान केले होते. गोळ्या शिरल्याने जर्किनची चाळण झाली होती. गोळीबार करताना चौघे आरोपी होते. दोघे जण लक्ष्मी काॅम्प्लेक्स इमारतीसमोर दुचाकीवर थांबले होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी ‘इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच,’ असे ओरडले. आरोपींनी परिसरात दहशत माजविली. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांकडून दहशत माजविण्याचे कलमही वाढविले जाणार आहे.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
आयुष कोमकर याच्यावर सोमवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुषचे वडील गणेश कोमकर वनराज आंदेकर खून प्रकरणात कारागृहात आहेत. न्यायालायने गणेश काेमकरला ‘पॅरोल’ (संचित रजा) मंजूर केला. नागपूर कारागृहातून त्याला पुण्यात आणण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी वैकुंठ स्मशानाभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर गणेश कोमकरला पोलीस बंदोबस्तात नागपूर कारागृहात रवाना करण्यात आले.