बारामती: बारामती तालुका पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंचायत समिती सभापती पदासाठी सोडत काढण्यात आली आहे. हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सोमवारी बारामती पंचायत समितीची गण आरक्षण सोडत जाहीर झाली. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी निरीक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या वेळची पंचायत समिती निवडणूक ही पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे प्रत्येक गणात तिरंगी किंवा चौरंगी लढती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गणनिहाय आरक्षण

सुपा, कऱ्हाटी, मुढाळे (सर्वसाधारण महिला), शिर्सुफळ, पणदरे, वडगांव निंबाळकर, निंबुत (सर्वसाधारण), गुनवडी (अनुसूचित जाती महिला), मोरगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कांबळेश्वर, डोर्लेवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), निरावागज (अनुसूचित जाती).