पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भिडे पूल १५ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. महामेट्रोने भिडे पूल बंद ठेवण्याबाबतचे पत्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.
शहरातील पेठांकडे जाण्यासाठी महामेट्रोकडून पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. ६ जूनपर्यंत हे काम करण्यात येणार होते. मात्र, हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भिडे पूल १५ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे पत्र महामेट्रोने महापालिका आणि वाहतूक पोलिसांना पाठवले आहे.
भिडे पूल हा डेक्कन परिसरातून सदाशिव पेठ, नारायण पेठ, तसेच नदीकाठच्या रस्त्यावरून शनिवार पेठेत जाण्यासाठी वापरला जातो. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.