पुणे : जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वाढदिवस साजरे करत असल्याचे निदर्शनास आल्याने या विभागाशी संलग्न राज्यातील सर्व कार्यालयांत वाढदिवस साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. ‘विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरे करत आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाऊन कामासाठी आलेले अभ्यागत आणि नागरिकांना तिष्ठत बसावे लागते. वाढदिवसासारखे वैयक्तिक समारंभ साजरे करणे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार उचित नाही. त्यामुळे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाची कार्यालये, संलग्न कार्यालयांत यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ साजरे करण्यात येऊ नयेत.

कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरे केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे दिवसे यांनी या परिपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, ‘जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख कार्यालयात यापूर्वी ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांना संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी तत्काळ समज द्यावी, यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा बाबी कार्यालयात घडणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ असेही दिवसे यांनी स्पष्ट केले आहे.