पुणे : उन्हापासून संरक्षण करणाऱ्या मलमांचा अर्थात सनस्क्रीनचा वापर भारतीयांच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनत आहे. मात्र, या सनस्क्रीनची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासणारे कोणतेही निकष शासकीय पातळीवर नव्हते. आता भारतात प्रथमच ही परिणामकारकता तपासणारे निकष लागू होणार आहेत. याबाबतची अधिसूचना भारतीय मानके विभागाने (बीआयएस) जाहीर केली आहे. या नवीन निकषांमुळे भारताने आता सनस्क्रीनच्या मानकांबाबत जागतिक पातळीवर बरोबरी केली आहे.

सध्या सनस्क्रीनच्या वेष्टणावर एसपीएफ ३०, ५०, ६० असे लिहिलेले असते. ‘सन प्रोटेक्शन फॅक्टर’ म्हणजेच एसपीएफ हा अतिनील किरणे – बी (यूव्हीबी) यापासून त्वचेचे किती संरक्षण करतो, हे दर्शवतो. ‘प्रोटेक्शन ग्रेड’ म्हणजेच ‘पीए’ हा सूर्याची अतिनील किरणे – ए (यूव्हीए) यापासून त्वचेचे किती काळ संरक्षण होते, हे दर्शवतो. ‘पीए’च्या पुढील अधिक चिन्हांच्या खुणा तो किती काळ त्वचेचे संरक्षण करतो, हे दाखविण्यासाठी असतात. ‘एसपीएफ’ किमान ३०, तर ‘पीए’ ‘प्लस प्लस प्लस’ असावा लागतो. सनस्क्रीनच्या वेष्टणांवर या दोन्ही गोष्टींचा दावा तर केला जातो, परंतु प्रत्यक्षात त्यांची यासाठी चाचणी झाली आहे का, याचे नेमके उत्तर कोणत्याही यंत्रणेकडे सध्या मिळत नाही.

आता भारतीय मानके विभागाने सनस्क्रीनवरील ‘एसपीएफ’ दाव्यांसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यानुसार, उत्पादकांना सनस्क्रीनची मानवी त्वचेवर चाचणी घेऊन त्यामुळे अतिनील किरणांपासून त्वचेचे कितपत संरक्षण होते, हे तपासावे लागेल. त्यानंतरच त्यांना उत्पादनावर ‘एसपीएफ’चा दावा करता येईल. सध्या प्रयोगशाळेत तपासणी करून उत्पादकच असा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात त्या सनस्क्रीनचा ‘एसपीएफ’ किती प्रभावी आहे, याची मानवी त्वचेवर प्रत्यक्ष चाचणी होत नव्हती. आता हे नवे निकष देशातील ग्राहक आणि सनस्क्रीन उत्पादकांसाठी मैलाचा टप्पा ठरणार आहेत. यामुळे सनस्क्रीन उत्पादनांबाबत अधिक पारदर्शकता, सुरक्षितता आणि त्यांच्या दाव्याबद्दल सत्यता या गोष्टींची खात्री ग्राहकांना मिळणार आहे. हे निकष पुढील वर्षीपासून लागू होण्याची शक्यता आहे.

भारतीय वर्णाचा विचार

सनस्क्रीनच्या निकषांमध्ये आधी भारतीय त्वचेच्या वर्णाकडे लक्ष देण्यात आले नव्हते. या प्रकरणी इंडियन ब्युटी अँड हायजिन असोसिएशनसह (आयबीएचए) या क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडून भारतीय मानक विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. आता भारतातील व्यक्तींच्या वर्णाचा विचार करून त्यानुसार त्याला सूर्यप्रकाशापासून कितपत संरक्षणाची आवश्यकता आहे, याचा विचार करण्यात येणार आहे. यामुळे सरसकट पाश्चात्य निकषांनुसार बनविलेली उत्पादने भारतीयांवर लादली न जाता त्यात भारतीय वर्णाचा विचार केला जाईल, असा सूर या उद्योगातून व्यक्त होत आहे.

मोठा भूभाग उष्ण कटिबंधीय असलेल्या भारतासारख्या देशात सूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. याची परिणामकारकता तपासण्यासाठी नवे निकष लागू होणे, ही स्वागतार्ह बाब आहे. यातून ग्राहकांची सुरक्षितता जपली जाणार आहे. – डॉ. विभव संझगिरी, कार्यकारी संचालक (संशोधन व विकास), हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड