पुणे : पाळीव श्वानाने वेगवेगळ्या घटनेत दोघांचा चावा घेतल्याची घटना घडली. शिवाजीनगर गावठाण, तसेच खडकीतील रेंजहिल्स भागात घडली. पाळीव श्वान मोकळे साेडून दुखापतीस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी दोन श्वान मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

शिवाजीनगर गावठाण परिसरातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ एका तरुणाचा ‘पीटबुल’ जातीच्या श्वानाने चावा घेतल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. श्वानाने तरुणाच्या पोटरीचा चावा घेतल्याने त्याला जखम झाली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका श्वान मालक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पीटबुल’ जातीचे श्वान आक्रमक आहे. श्वान मालकाने त्याला साखळी न बांधता रस्त्यावर सोडले होते, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

खडकीतील रेंजहिल्स भागात किरकोळ वादातून एकाने त्याचे पाळीव श्वान अंगावर सोडले. पाळीव श्वानाने चावा घेतल्याने एक जण जखमी झाला. याप्रकरणी श्वान मालकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खडकीतील रेंजहिल्स भागात राहायला आहे. तो त्याच्या पाळीव श्वानाला घेऊन २६ ऑक्टोबर रोजी सकाळी थांबला होता. त्यावेळी आरोपीने तक्रारदार तरुणाच्या गाडीच्या दिशेने भिरकावला. तक्रारदार इमारतीतून खाली उतरले. ‘दगड का भिरकावला?’ अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने त्याचे पाळीव श्वान तक्रारदार तरुणाच्या अंगावर सोडले. श्वानाने चावा घेतल्याने तरुण जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

पाळीव श्वानावरुन वाद नित्याचे

पाळीव श्वान अंगावर सोडल्याने शहरात यापूर्वी वादावादीच्या घटना घडल्या आहेत. पर्वती भागात पाळीव श्वान अंगावर आल्याने एकाने त्याच्याकडे पिस्तुलातून श्वानावर गोळीबार केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली हाेती. अनेकजण सकाळी फिरायला जाताना पाळीव श्वान बारोबर घेऊन जातात. पाळीव श्वानाला साखळी बांधत नाहीत. पाळीव श्वानाने बाणेर भागात सकाळी फिरायला बाहेर गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा चावा घेतल्याची घटना घडली होती. श्वानाने चावा घेतल्याने ज्येष्ठाला गंभीर दुखापत झाली होती. बुधवार पेठेतील रतन चित्रपटगृहासमोर एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा पाळीव श्वानाने चावा घेतला होता. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, श्वान मालक माहिलेविरुद्ध विश्रामबग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.