भाजपा नेते आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) शिवसेनेवर निशाणा साधला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगत होत्या. यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेकडे एकनाथ खडसे यांना देण्यासारखं आहे तरी काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देऊन अभिवादन केलं. त्यानंतर प्रसार माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करावा असं या सरकारला आवाहन करतो, असंही पाटील यांनी यावेळी नमूद केलं. यावेली त्यांनी अन्य विषयांवरही भाष्य केलं.

मी आणि कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे. ते शिवसेनेत जातील म्हणण्याला काही अर्थ नाही. शिवसेनेकडे त्यांना देण्यासाठी आहे तरी काय? एकनाथ खडसे मोठे नेते आहेत, असं पाटील यावेळी म्हणाले. कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली, त्यामुळे अपयश आलं आहे. आम्हाला हरवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागलं आहे. सोलापूर आणि सांगलीमध्ये आम्ही विजयी झालो हे पण लक्षात घेतलं पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनं नीतिमूल्य सोडली
विद्यमान सरकारनं नीतिमूल्यं सोडली आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांचं काहीही पडलेलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला. आता बस, यांना बकीच्यांशी काहीही घेणंदेणं नाही. दिवाकर रावते, भास्कर जाधव यांना त्यांनी डावललं आहे. अजूनही अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीनं घ्या, बघा काय होते ते, माझं त्यांना हे आव्हान आहे, असंही पाटील म्हणाले.