चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता टेकवडे निवडून आल्या. पराभूत होऊनही शिवसेनेचे विजय गुप्ता यांनी मारलेली मुसुंडी आणि ऐनवेळी पक्ष बदलूनही भाजपच्या गणेश लंगोटे यांच्या पदरात पडलेली मते लक्षवेधी ठरली आहेत. ‘लक्ष्य २०१७’ साठी तगडय़ा राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप-शिवसेनेने आपापसात लढल्यास पराभव निश्चित असल्याचा सूचक संदेश पिंपरी पोटनिवडणुकीत मिळाला होता, त्यावरच काळभोरनगर-मोहननगरच्या मतदारांनीही शिक्कामोर्तब केले आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली. अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी व शहरातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता अजितदादांना निवडणूक नको होती, बिनविरोधसाठी त्यांनी स्थानिक नेत्यांमार्फत प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. भाजपने व त्या पाठोपाठ शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीला राजकीय आखाडय़ात उतरणे भाग पाडले. टेकवडे यांची पत्नी सुजाता यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. अपेक्षेप्रमाणे सहानुभूतीच्या जोरावर त्या निवडून आल्या. मात्र, त्यांचे मताधिक्य पाहता ही जागा राखताना राष्ट्रवादीची बरीच दमछाक झाल्याचे दिसते. या निवडणुकीत सेनेने दिलेली कडवी लढत आणि भाजपला पडलेली मते ही राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी आहे. पालिकेत १२८ पैकी तब्बल ९६ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. स्थानिक नेत्यांची ‘दमदार’ फौज राष्ट्रवादीकडे आहे. तरीही राष्ट्रवादीला विजयासाठी झुंजावे लागले. सहानुभूतीचा विषय नसता तर कदाचित शिवसेनेचे गुप्ता विजयी ठरले असते. शिवसेनेची हक्काची मते, बाबरांचा प्रभाव, अमोल कोल्हे, नितीन बानुगडे यांच्या सभा, व्यापारी व अमराठी लोकांची मते, शिवसैनिकांचे परिश्रम आणि गुप्ता यांनी केलेला पैशाचा धूर या गोष्टी जुळून आल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीची संघटित शक्ती प्रभावी ठरल्याने गुप्ता पराभूत झाले. पिंपरी विधानसभेतून गौतम चाबुकस्वार निवडून आले, तेव्हाच्या पोटनिवडणुकीत अशाच संघटित शक्तीमुळे आमदारबंधू पराभूत झाले होते. तेव्हा रिपाइं-भाजप व शिवसेना समोरासमोर लढल्याने मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीला झाला. याही वेळी राष्ट्रवादी हा ‘समान शत्रू’ असूनही शिवसेना-भाजप परस्परविरोधात लढले, त्याचा फटका युतीला बसला आणि राष्ट्रवादीची सरशी झाली. भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला. पालिकेत सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला एकतर स्वत:चा उमेदवार मिळाला नाही. दुसरे म्हणजे, तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची नामुष्की ओढावली. आगामी काळात राष्ट्रवादीशी दोन हात करताना सेना-भाजपची युती करायची की नाही, याचे उत्तर मतदारांनीच दोन पोटनिवडणुकांच्या माध्यमातून दिले आहे.
—
सुजाता टेकवडे (राष्ट्रवादी)- ३४८६
विजय गुप्ता (शिवसेना)- २८५५
गणेश लंगोटे (भाजप)- २००२
नोटा- १०३
सुजाता टेकवडे ६३१ मतांनी विजयी.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
परस्परांशी लढला तर पराभव निश्चित, भाजप-शिवसेनेला पुन्हा संदेश
पराभूत होऊनही शिवसेनेचे विजय गुप्ता यांनी मारलेली मुसुंडी आणि ऐनवेळी पक्ष बदलूनही भाजपच्या गणेश लंगोटे यांच्या पदरात पडलेली मते लक्षवेधी ठरली आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-01-2016 at 03:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena bi election ncp